मुंबई : सुपरहिट मराठी सिनेमा 'सैराट'चे दिग्दर्शक नागराज मंजुळे बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. 'झुंड' असं या सिनेमाचं नाव आहे. हा सिनेमा एका रिटायर्ड स्पोर्ट्स टीचरवर आधारीत आहे. जो झोपड्यांमधील मुलांना फुटबॉल शिकवतो. या सिनेमामध्ये या टीचरचा रोल अभिनेता अमिताभ बच्चन करणार होते. पण आता बातमी अशी येते आहे की त्यांनी हा सिनेमा करण्यास आता नकार दिला आहे. त्यामुळे आता या सिनेमात बीग बी दिसणार नाही आहेत. बीग बी मागच्या वर्षी हा सिनेमा करायला तयार झाले होते. पण आता कोणतंही कारण न सांगता या सिनेमातून वेगळे झाले आहेत.
पण सुत्रांच्या माहितीनुसार एक वर्ष होऊन ही शूटींग सुरु झाली नाही. याचं नेमकं कारण देखील बीग बींना सांगण्यात आलं नाही. बीग बींना इतर सिनेमांच्या शूटींगसाठी देखील तारीख द्यायची होती. त्यामुळे ते अजून वाट पाहू शकत नव्हते. त्यामुळे ते या सिनेमातून आता वेगळे झाले आहेत. सिनेमामध्ये काही कॉपीराईटसंबंधित अडचणी देखील होत्या. यानंतर अमिताभ यांनी घेतलेली सायनिंग अमाऊंट परत केली आहे.
नागराज मंजुळे अमिताभ बच्चन यांचं मोठे फॅन आहेत. लहानपणी ते अमिताभ यांची कॉपी करायचे असं देखील त्यांनी सांगितलं होतं. मुलांमध्ये वाढतं नशेचं प्रमाण आणि गुन्हेगारी यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. रियल लाईफ कॅरेक्टरवर आधारीत हा सिनेमा आहे. सैराट संपल्यानंतर लगेचच या सिनेमाच्या स्क्रिप्टींगचं काम त्यांनी सुरु केलं होतं.