नवी दिल्ली : महानायक अमिताभ बच्चन सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तां’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. सेटवर स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक कठोर परिश्रम करतात, हे पाहून त्यांना अतिशय आनंद झाला. अमिताभ यांनी चित्रपटासंबंधित ब्लॉक लिहिताना सांगितले की, सेटवर स्त्री कर्मचाऱ्यांना अधिक काम करताना पाहून खूप छान वाटले. त्यांनी लिहिले, “ठग्स ऑफ हिंदोस्तां चे काम सतत चालू असून त्याबद्दल मला खूप काही लिहायचे आहे, पण गोपनीयता ठेवण्याच्या अटीमुळे मी स्वतःला तसे करण्यापासून रोखत आहे आणि म्हणून मी शांत आहे. पण सेटवर विविध विभागात काम करत असलेले लोक अतिशय सक्रिय आहेत."
अमिताभ यांनी पुढे लिहिले की, "आणि विशेष म्हणजे सेटवर पुरुषांपेक्षा महिला अधिक मेहनत घेताना दिसत आहेत, ते ही अशा क्षेत्रात ज्यात स्त्रिया काम करू शकतील, अशी कल्पना देखील आमच्या काळात केली जात नव्हती. हे पाहून खूप छान वाटते."
या चित्रपटात आमिर खान, कतरिना कैफ आणि ‘दंगल’ची अभिनेत्री फातिमा सना शेख हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्य करत आहेत. हा चित्रपट २०१८ मध्ये दिवाळीला प्रदर्शित होईल.