मुंबई : 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी' या चित्रपटाच्या वाट्याला येणारं यश पाहता अभिनेत्री कंगना रानौत हिच्या कारकिर्दीत आणखी एखा सुपरहिट चित्रपटाची भर पडली आहे हे स्पष्ट होत आहे. संपूर्ण कलाविश्वाकडून कंगनाच्या या चित्रपटावर आणि तिच्या अभिनय कौशल्यावर स्तुतीसुमनं उधळली जात असताना काही कलाकार मात्र याला अपवाद राहिले. ज्यामध्ये आमिर खान, आलिया भट्ट यांच्या नावांचटा समावेश आहे. त्यांच्या या भूमिकेबद्दल कंगनाने वक्तव्य करत घराणेशाहीविरोधातील तिची भूमिका आणि स्पष्टवक्तेपणा या साऱ्यामुळे सारं कलाविश्व अपल्या विरोधात असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तिच्या याच स्पष्टवक्तेपणाची प्रशंसा ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे.
'कंगना महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण आहे', असं मत त्यांनी मांडलं. ट्विरटवर घेण्यात आलेल्या प्रश्नोत्तरांच्या सत्रात त्यांनी कंगनाविषयीचं आपलं मत मांडलं. 'कंगना रानौत ही खऱ्या अर्थाने रॉकस्टार आहे. ती अतिशय बुद्धीमान आहे. मी तिच्या धाडसाची आणि चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकांची प्रशंसा करतो. महिला सबलीकरणाचं ती एक उत्तम उदाहरण आहे', असं त्यांनी लिहिलं.
काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात कंगनाला तिच्या चित्रपटाला कमी प्रमाणात मिळणाऱ्या पाठिंब्याविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचवेळी तिने, 'मला या साऱ्याचा कसा फायदा होईल?' असा प्रश्न विचारत उपरोधिकपणे आपलं मत मांडलं होतं. 'वयाच्या ३१व्या वर्षी मी दिग्दर्शिका आहे, ३ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी (इतर कलाकारांनी) स्वत:ची प्रसिद्धी नीट केली तरी ती मोठी बाब असेल. झाशीची राणी माझी नातेवाईक नव्हती. पण, ती जितकी माझी आहे तितकीच तुमचीही आहे. या लोकांना नेमकी कशाची भीती वाटते? मी घराणेशाहीविषयी बोलते म्हणूनच ते घाबरतात का? असा थेट प्रश्न उपस्थित करत तिने काही कलाकारांवर निशाणा साधला.
आपल्या विरोधात बॉलिवूडमध्ये एक गट तयार करण्यात आला असून, कंगना घराणेशाहीविरोधात बोललीच का, अशीच त्या गटात असणाऱ्यांची भूमिका असल्याचं तिने स्पष्ट केलं. 'मी त्यांनी वाट लावेन...', असं म्हणत प्रत्येकाचा खरा चेहरा समोर आणण्याचा निर्धार तिने व्यक्त केला. त्यामुळे पुन्हा एकदा क्वीन कंगना आणि कलाविश्वातील काही चेहरे अशा दोन गटांमध्ये असणारी दरी सर्वांचं लक्ष वेधत आहे.