मुंबई : दिगदर्शक अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'सांड की आंख' या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. शुक्रवारी चित्रपटाच्या टीमने रॅपअप सिलेब्रेशन केलं. आता भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नूच्या या चित्रपटाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या चित्रपटातून मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची बहीण अभिनय क्षेत्रातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचं समोर आलं आहे.
'सांड की आंख' चित्रपटातून आमिर खानची बहीण निखत खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, शूटर आजीच्या पात्रासह चित्रपटात आणखी काही पात्र देखील आहेत ज्यांना चित्रपटात महत्व देण्यात आलं आहे. त्यापैकीच एक भूमिका आमिर खानची बहीण निखत खान साकारणार आहे. त्यामुळे 'सांड की आंख' हा चित्रपट निखत खानसाठी पदार्पणातील चित्रपट ठरणार आहे. निखतच्या भूमिकेबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु चित्रपटात निखत एका महाराणीची भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. चित्रपटात निखत खानची छोटीशी भूमिका नसून संपूर्ण चित्रपटात तिची प्रमुख भूमिका असणार आहे. चित्रपटात तापसी आणि भूमीसह प्रकाश झा आणि विनीत सिंहदेखील प्रमुख भूमिकेत आहेत.
निखत खान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असली तरी लहान वयापासूनच निखत खानने चित्रपटांच्या निर्मितीचं काम केलं आहे. निखतने ९०च्या दशकात 'तुम मेरे हो' चित्रपटाची निर्मिती केली होती. यात निखतने आपल्या वडिलांसह सह-निर्माता म्हणून काम केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये 'हम किसी से कम नही' चित्रपटासाठी निखतने कॉस्टयूम अस्सिटन्ट म्हणून काम केलं होतं. संतोष हेगडे निखत खानचे पती असून निखतला श्रवण हेगडे आणि सेहर हेगडे अशी मुलं आहेत.
'सांड की आंख' येत्या २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत असून वृद्ध शार्प शार्प शूटर चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांची भूमिका साकारत आहेत. निधी परमार आणि अनुराग कश्यप यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून तुषार हीरानंदानी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.