मुंबई : शिष्यांच्या आयुष्यात गुरुंचे स्थान महत्त्वाचे असते. कोणत्याही कामाची सुरुवात करताना आपण आपल्या गुरुंचे मार्गदर्शन घेतो. क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचे बुधवारी निधन झाले. यामुळे क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींसाठी क्रिकेटचा देव असलेल्या सचिनला देखील अश्रू अनावर झाले.
आचरेकर सरांच्या अंत्यसंस्कारावेळी सचिनला गहिवरून आले आणि त्याचे डोळे पाणावले. ज्यांनी आपल्याला घडवले त्यांचे या जगातून जाणे फार दुख:दायक असते. सर आपल्यात नसल्याच्या भावनेने सचिन भावनाविवश झाला. ज्या सरांच्या मार्गदर्शनाखाली त्याने क्रिकेटचे धडे गिरवले, त्यानांच खांदा द्यावा लागणे ही अत्यंत दुःखद बाब असते. लहानपणापासून ते यशाच्या शिखरावर पोहचण्यापर्यंत सचिनच्या क्रिकेट विश्वातील प्रवासात रमाकांत आचरेकरांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. सचिनला शिष्य म्हणून सर्वाधिक काळ सरांसोबत घालवता आला. यापुढे सर आपल्यात नसतील यामुळे आपण पोरके झाल्याचे भाव सचिनच्या चेहऱ्यावर दिसत होते.
सचिनने गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरला सरांची भेट घेतल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले होते. दरम्यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सचिनने रमाकांत आचरेकर सरांबद्दल आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी झी मीडियासोबत बोलताना सचिन म्हणाला की, सर हे माझ्यासाठी मंदिराप्रमाणे होते. शाळेच्या पहिल्या सामन्यापासून ते आतापर्यंत मी त्यांचा आशीर्वाद घ्यायचो. त्यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच शक्य नव्हते.