शितल शिंदे, झी मीडिया मुंबई : पहाटे आरशात पाहून स्वतःला.. हैराण झालो। होतो मी मुलगा आज कसा मुलगी झालो... लांब माझे केसं... आणि सुंदर हे डोळे... गुलाबाच्या पाकळ्यां सारखे ओठ माझे. पाहून झालो मी दंग..आई म्हणाली "उठ गं तयार हो जायचं नाही का कामाला तुला ?" वेगळंच वाटल काहीतरी। मला मुलगी असण्याची जाणीव झाली. उठलो मी पटकन धडपडत. उशीर झालेला आधीच..
अंघोळ करून झटपट तयार होऊन गेलो बाबा जवळ. डोक्यावर हात ठेवून बाबा म्हणाले "लवकर ये हा बाळा अंधार पडायच्या आधी" पाया पडून मी रोजची बॅग घेऊन निघालो होतो की...आई ने हाक दिली "अगं अंथरूण काढ घर लोट, डब्बा कोण घेणार ? , कशी विसरलीस आज?" डोक्यावर हाथ मारून पुन्हा गेलो आत, आता सगळी काम करायची... आहहह... पुन्हा जाणीव झाली मी मुलगी आहे याची.
निघालो... ते टॉप आणि स्कर्ट सांभाळत चालत होतोच की हिल्स मध्ये निदान दोन वेळा तरी धडपडलो वाऱ्हांड्या मध्ये. आराध्या स्टेशनला थांबलेली माझ्यासाठी... भेटून ती पुन्हा म्हणाली, 'तुझ आज पण लायनर विस्कटलं वाटत..' पळत पळत जात होतो ट्रेन पकडायला मी.. तेवढ्यात आराध्या ओरडून म्हणाली.. 'अग मुलगी आहेस विसरू नकोस काशी पाळतेस? बघतायत बघ सगळे...' तेव्हा सावरलं स्वतःला आणि नीट झालो. सगळे असे पाहतायत जणू चोरी करूनच पळतोय... एक काका मला वरून खालपर्यंत 'स्कॅन' करतोय.. मी टॉप संभाळत बॅग घट्ट पकडली आणि दुसरीकडे फिरलो, तेव्हा मला परत जाणीव झाली मुलगी आहे मी...हुश्श आली ती पुढची ट्रेन... आणि त्या गर्दीत चढलो मी "उतरणार का दादर ला विचारात विचारत गाडीच्या दरवाज्याकडे पोहचलो... त्या गर्दीला टाटा बाय बाय करत उतरलो दादर ला... एखादं मिशन कंम्पलिट केल्यासारख वाटलं।
"आराध्या कुठे चाललीस ?...सोबत चल ना" असं बोलून पळत्या आराध्याला स्लो डाउन केलं ... स्टेशन वरून उतरून बस साठी धाव घेतली... बस स्टॉप वर तापत्या उन्हात सर्वांच्या तोंडात एकाच गाणं "कधी येते बस, उशीर झालाय" आणि त्या उन्हात मला पडतो तो एकच प्रश्न सर्वानाच कसा बर उशीर झाला?? आली ती बस पटकन चढलो मी आत. आधीच ट्रेनच्या गर्दीत हाल... एक हाताने बॅग पकडली एक हाताने हँडल, कंडक्टर काका ला पैसे देऊन तिकिट काढले... चेंगरून त्या गर्दीत खूप हाल झाले... घामाने हात ओले होऊन ते तिकीट सुद्धा भिजून गेलं... तेवढ्यात धक्का देऊन एक दादा जाताच होता, मी ओरडून बोललो 'आओ भाऊ जरा बघून.. चान्स मारता काय??' माझा आवाज ऐकून पटकन उतरला तो बस मधून.. तेवढयात मागून एक आवाज ऐकू आला "असे कपडे घातले तर पोरं हात लावणारच" मागे वळुन त्या मुलींकडे रागात पाहुन मी उतरलो माझ्या स्टॉप ला... राग माझ्या मस्तकात उफळत होता. आराध्याने मला कस बस शांत केलं...राग याचा नाही की तो मुलगा माझी छेड कडून गेला... अजून पण कपड्यांवरून कसे कोणी कोणाला जज करू शकतं ? ... ते पण मुलीचं ?.. याचा मला खरा राग आला होता...
मी स्वतःवरच चिडून लिफ्ट मध्ये गेलो... वॉशरूम मध्ये जाऊन पाहिलं तोंडावर पाणी मारलं... आरशात स्वतःला पाहून पुन्हा एकदा जाणीव झाली...मुलगी आहे मी... मेकअप माझा नीट करून, चेऱ्यावर ती हास्य घेऊन डेस्कवर जाऊन बसलो.. हळूच एक हात माझ्या खांद्यावर कोणी ठेवला... अनोळखी स्पर्श मला जाणवला... आणी मी पटकन तोच हात झटकला.. उभा राहिलो पटकन रागात पाहिलं त्याच्याकडे.. आणी तो दुसरा कोणी नसून माझा बॉस होता "सॉरी मला वाटलं माझा मित्र बसलाय"अस तो पटकन बोलला . रागा मध्ये मी तिथून निघून गेलो. दिवस गेला कसा बसा ऑफिस मध्ये निघून परतायची वेळ झाली सगळी तयारी केली...
पण आता जरा जपून... पाय माझे दुखू लागले.. पोटात आला गोळा... रात्री आई बरोबर जायचं सिनेमाला जायचय या आनंदानेच विसरलो सगळं. निघालो टॉक्सीच्या शोधात... भेटली मला टॅक्सी आणि बसलो मी पटकन... ड्रायव्हर काका अरशातून असं पाहतोय जणू मी त्याच्यासाठीच तयार होऊन बसले... संभाळत माझा टॉप, ओढल मी माझं स्कर्ट, खिडकी बाहेर माझं लक्ष वेधलं... पुन्हा तोच प्रवास ट्रेन आणि ती गर्दी तर ऐक जीवनाचा भाग... परतताना वाजले नऊ काळोख पडला रस्त्यात... बाबाने म्हटलेले शब्द आले माझ्या लक्षात "अंधार पडायच्या आधी ये हा बाळा..." जास्त लांब नव्हत माझं घर, फक्त १५मिनिटांच होतं अंतर... रिक्षा आणि टॅक्सी आत नाही येत पायी चालावे लागतं.. हळूहळू माझी पावल घराकडे निघाली... मागून कोणी असल्याचा झाला मला भास आणि माझी चालण्याची गती वाढली. एकदाचा घरी कधी जातो ही धडपड सुरू झाली... चालत असताना हळूच मागे वळून पाहिलं. हुश्श कुत्रा आहे हे पाहून जिवात जीव आला.. दीर्घ श्वास घेतला "कुत्र्याची नाही तर माणसाची भीती वाटते" हा विचार करून हसलो मी गालात नंतर...
पोटात माझ्या गोळा घेऊन मी गेलो घरात पळत... बाथरूम मध्ये बघतो तर काय रक्त... आणि ते पाहून पाय माझे गेले गळून.. प्रत्येक महिन्यातल्या त्या ४ दिवसांची आठवण आली... म्हणजे हो तीच, तिच ती मासिक पाळी... पोटात गोळा घेऊन मी बेड वर झोपलो... पायांना कुशीत घेऊन त्यांना मिठी मारून झोपलो.. मग कसला सिनेमा आणि कसलं काय ? जेवायला उठण्याइतकी पण ताकद माझ्यात नव्हती...
सगळे प्लॅन्स रद्द आणि डोळ्यात पाणी घेऊन झोपलो त्या अंधारात...
तेवढ्यात आईचा आवाज ऐकू आला.. "आरे उठ की मुला... किती झोपणार अजून ?"
दचकून उठलो अनि पट्कन आरशात पाहिलं चेहऱ्याला हात लावत सुटकेचा श्वास घेतला...
तेच खराब केस आणि झोपून ते सुजलेलं तोंड... मी मुलगाच आहे ह्याची मला जाणीव झाली... पटकन आईला मिठी मारून तिच्या गालावर मुका घेऊन अंघोळीला पळालो..