मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...

खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय.  

रिद्धी म्हात्रे | Updated: Jul 16, 2022, 08:58 AM IST
मासिक पाळी 'नॉर्मल' होतेय...  title=

रिद्धी म्हात्रे / वृत्त निवेदिका आणि सहाय्यक निर्माती, झी 24 तास / मुंबई :  खरंतर निसर्गतः लाभलेली गोष्ट ही 'नॉर्मल'च असायला हवी. पण मूल जन्माला येणं, मृत्यू होणं यासारखंच पाळी ( periods) येणं नॉर्मल मानलं जातं नव्हतं किंवा तितकंसं सहज बोललं जात नव्हतं. पण आता काळ आणखी बदलतोय. पाळीबद्दल, त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल मोकळेपणाने बोललं जातंय. फक्त भाषण, व्याख्यानं, लेख, चर्चासत्र, परिसंवाद यातूनच नाही तर इतके दिवस लाजून आणि पर्यायी शब्द वापरून पाळीबद्दल बोलणाऱ्या बायकासुद्धा आता स्पष्ट आणि थेट बोलतायत. 

'पॅडमॅन'  यासारख्या चित्रपटांच्या निमित्ताने मासिक पाळी आणि पॅडबाबत चर्चा झालीच. पण चीनच्या एका खेळाडूने काही दिवसांपूर्वी फायनल मॅच हरण्यामागे 'माझा पाळीचा पहिला दिवस असल्यामुळे त्रास होत होता' असं कारण दिलं. ती खेळताना तिला होणारा त्रास स्पष्टपणे कळून येईल असे तिचे फोटोज सुद्धा व्हायरल झाले. तिने पाळीच्या त्रासामुळे हरल्याचं अगदी 'नॉर्मल' गोष्ट असल्यासारखं सांगितलं. शिवाय "मी मुलगा असते तर बरं झालं असतं" असंही पुढे म्हणाली. तिच्यासारख्या असंख्य जणींना केवळ 'पाळी' या जीव असह्य करणाऱ्या एका कारणामुळे आपण मुलगा म्हणजे पुरुष असतो तर बरं झालं असतं असं नक्कीच वाटून जातं. 

Urfi javed जेव्हा पाळीबद्दल बोलली, तेव्हाचा हा ड्रेस आणि....

गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद तिच्या 'वेगळ्या' स्टाईलमुळे 'भलतीच' प्रसिद्ध झाली आहे. कायम अंगप्रदर्शन करणारी आणि कॅमेरा दिसला की लगेच अभिनय करणारी उर्फी चक्क 'पूर्ण कपड्यात आणि गप्प गप्प दिसली' त्याबाबत विचारलं असता शांतपणे आणि सहज 'पाळीचा पहिला दिवस असल्याचं' सांगून गेली. खरंतर तिने हे वाक्य उच्चारलेल्या या वाक्यानंतर तिच्या 'नॉर्मल' बोलण्याचं कौतुक वाटलं असलं तरी ती हे वाक्य बोलताना म्हणजे तिच्या पाळीचा पहिला दिवस असतानाही तिच्या पांढऱ्याशुभ्र ड्रेस घालण्याच्या धाडसाचं माझ्यासारख्या अनेकींना कौतुक आणि अप्रूप वाटून गेलं असणार हे मात्र नक्की! 

zheng qinwen हिने पाळीच्या वेदनामुळे सामना हरल्याचं सांगितलं

काही दिवसांपूर्वी वाचनात आलं की कॉर्पोरेट जगतात सध्या 'पिरियड लिव्ह' ही संकल्पना रुजतेय. पाळीच्या दिवसात येणारा थकवा आणि शरीरावर मनावर होणारे इतर परिणाम समजून विदेशात 'ते' चार दिवस बायकांना सुट्टी देतात म्हणे! भारतातही अशी संकल्पना लवकरात लवकर रूजो! मर्दानी चित्रपटाच्या शेवटाकडे जाताना पोलीस ऑफिसरची भूमिका बाजावणारी राणी मुखर्जी एका मुलाखतीच्या सिनमध्ये जेव्हा पाळीच्या त्रासाचा पाढा वाचते, तेव्हा एक बाई म्हणून आणखी खमक्या वाटायला लागतो आपण स्वतःला! 

हल्ली घराघरात, शाळा-कॉलेजमध्ये, पुरुषांसमोर अगदी सहज पाळीचा विषय आणि समस्या चर्चेत येतात. पूर्वी विशेष काही न बोलणारी किंवा बायकांच्या मासिक पाळीच्या विषयात लक्षच न घालणारी पुरुष मंडळीही आयुष्यातल्या सगळ्या स्रियांची मासिक पाळी समजून घेतात. त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि त्यांना आराम मिळेल असे वागतात. एकंदरीत मासिक पाळी 'नॉर्मल' होत आहे.