अमित भिडे, सीनियर प्रोड्युसर, झी २४ तास : आशियाचा पाचू अशी ओळख असलेला, भारताच्या पुराणातही उल्लेख असलेला, भारतीय उपखंडाला लागून असलेला, भारताच्या नकाशात ठळकपणे दिसूनही भारताचा कधीच भाग नसलेला, कधी काळी सोन्याची लंका असं बिरूद मिरवणारा श्रीलंका हा भारताचा अनादी अनंत काळाचा सख्खा शेजारी आज अक्षरशः भिकेला लागलाय.
सर्वसामान्य जनता महागाईच्या झळांमध्ये होरपळून निघालीय. पेट्रोल डिझेलच्या श्रीलंकेतल्या किंमती ऐकल्या तर भारतात पेट्रोल फारच स्वस्तात मिळतं असं सर्वसामान्य म्हणेल. रोजचं जगणं महाग झालंय, पोटाला दोन वेळा मिळणं मुश्कील तिथे शिक्षण ही तर चैनच झालीय.
कोविडनंतर अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण ठप्प झालंय. सरकार सर्वसामान्यांचा आवाज ऐकण्यात सतत अपयशी ठरला आणि शेवटी त्याचा उद्रेक झाला. आधीच श्रीलंकेने कित्येक दशकांचं सिव्हील वॉर अनुभवलंय. त्यामुळे श्रीलंकेचं कंबरडं मोडलेलंच होतं. ब्रिटीश आणि डचांच्या तत्कालीन धोरणांमुळे आणि नंतर चांगले नेते न मिळाल्याने श्रीलंका सुजलाम सुफलाम असूनही अन्नधान्याबाबत उपाशीच राहिलेला देश.
बहुतांश फळफळावळ, भाज्या, कांदे, टोमॅटो या रोजचा जेवणातल्या भाज्याही आयात करण्याची वेळ श्रीलंकेवर आलीय. पण श्रीलंकेतली जनता खूप सोशीक आहे, विचारी आहे, शांतीप्रिय आहे. याचाच गैरफायदा इथल्या राज्यकर्त्यांनी घेतला. जनतेच्या सहनशीलतेचा अखेर उद्रेक झाला आणि त्याची परिणती ही एवढ्या मोठ्या आंदोलनात झाली.
जवळपास 100 दिवस हे आंदोलन झालं. अखेर राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना देश सोडून पळून जावं लागलं. त्यांचा मोठा भाऊ आणि माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे, पळून गेलेले अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे, चमल राजपक्षे आणि बसल राजपक्षे यापैकी कोणीच श्रीलंकन जनतेला नको आहेत. पंतप्रधान विक्रमसिंघेही जनतेत अत्यंत अप्रिय झालेत.
या सर्वांनी स्वतःच्या फायद्यासाठी जनतेला खड्ड्यात घातलं अशीच जनतेची भावना झाली आहे. जनतेचं हे असं मत कशामुळे झालं? एवढे शांतीप्रिय लोक अचानक एवढे का संतापले? अध्यक्षांना देश सोडून का पळून जावं लागलं? याचा आढावा घेण्यासाठी झी 24 तासची टीम पोहोचली थेट कोलंबोत.
पुढच्या लेखात वाचूया आंदोलकांचं नेमकं म्हणणं तरी काय आहे.