अमित गडगे, झी मीडिया, मुंबई : अन्नाचं पचन करण्यासाठी प्रत्येक प्राण्यामध्ये निसर्गानं एक तरल पदार्थ दिला आहे. त्याला आपण लाळ म्हणतो. सर्पविष हा त्यातलाच काहीसा प्रकार. आपल्या तोंडात जशा लाळीच्या ग्रंथी असतात. तशी सापाच्या तोंडात विषग्रंथी असते. आपण काही खाल्लं की तोंडात आपसूक लाळ तयार होते. पण सापांच्या बाबतीत थोडं वेगळं असतं. विषारी, बिनविषारी आणि निमविषारी असे सापांचे प्रकार आहेत. या प्रकारांनुसार त्यांच्या पचनसंस्थेत थोडाफार फरक असतो.
आपण केवळ विषारी सापांबाबत जाणून घेऊयात. विषारी सापांच्या टाळूजवळ एक पोकळ पिशवी असते तिला विषग्रंथी म्हणतात. या विषग्रंथीमध्ये विषाची निर्मिती होत असते. अगदी सतत.... हे विष अनेक घटकांपासून तयार होतं. जे सापाला पाचक रसाप्रमाणे मदत करतं. भक्ष मारण्यासाठी आणि त्याचं पचन सुलभ करण्यासाठी विषाची मोठी मदत होते. सापाचं विष किंचीत पिवळसर असतं काही सापांमध्ये त्याचा पिवळा रंग थोडा गडद असतो.
वातावरणानुसारही यात फरक आढळतो. यात रायबोफ्लाविन (Riboflavin- जीवनसत्व बी-2 हे कडधान्यातही असतं. खाल्लेलं अन्न पचवण्यास आणि शरीराला लागण्यास याची मदत होते.) नावाचं जिवनसत्व असतं त्यामुळे सापाच्या विषाला असा रंग प्राप्त असतो. या जीवनसत्वाच्या प्रमाणानुसार सर्वविषाच्या रंगात बदल होतो. काही सापांचं विष तर रंगहीन देखील असतं. सापाचं विष पाण्यापेक्षा किंचीत जाड आणि जड असतं.
हिवाळ्यात काही सापांचं विष अधिक जाड होतं. उदा. घोणस, फुरसे इ.
या विषाची चव कशी असते?
सापाचं विष हे किंचीत कडवट आणि तुरट असतं. त्याला कोणताही वास नसतो. आता एक गंमत सांगतो. या विषाचा मानवच्या रक्तप्रवाहाशी संपर्क आला तरच त्याचे दुष्परीणाम शरिरात दिसू लागतात. म्हणजे जर तुमच्या तोंडात किंवा आतड्याला कोणतिही जखम नसेल तर तुम्ही तोंडावाटे सापाचं विष सहज पचवू शकता. पण जर तोंडात किंवा शरिरात जखम असेल तर तुमचा खेळ खलास.
अगदी दाताला किड असेल तरिही...(कृपया हा प्रयोग करु नका). मात्र हे विष शरिराच्या डोळ्यांसारख्या नाजूक अववावर पडलं तरी आपलं काम करु शकतं. या विषाचा अभ्यास करण्यासाठी ते सुकवलं जातं. विष सुकवण्याच्या या प्रक्रियेला लायोफ्रिझेशन (Lyophization) असं म्हटलं जातं. त्यासाठी -30 ते -40 अंश तापमानाची गरज भासते.
या तापमानावर सर्पविष गोठवलं जातं त्यानंतर त्याचे स्फटीक बनतात. हे स्फटीक पाण्यात टाकले की ते पुन्हा त्याच्या मुळ रुपात येतात. विष गरम केल्यासही त्याचे स्पटीक बनतात पण त्यातले बरेसचे घटक नष्ट होतात. हे विष प्रत्येक जातीच्या सापात वेगळ्या प्रकारचं असतं. त्यानुसार विषारी सापांचं दोन प्रकारांत वर्गीकरण केलं जातं.
पहिला प्रकार मज्जासंस्थेवर आघात करणारं (Neuro toXic) हे विष प्राण्याच्या मज्जासंस्थेवर आघात करतं उदा. नाग, मण्यार इ. तर दुसरा प्रकार रक्ताभिसरण संस्थेवर आघात करतं (Hemo toxic) उदा. घोणस, फुरसे इ. त्यामुळे यातील कोणत्या जातीचा साप चावला त्या आधारे व्यक्तीला प्रतिसर्पविष दिलं जातं. आता प्रतिसर्पविषाची माहीती घेऊया आपल्या पुढील भागात...
अमित गडगे.