हसत खेळत गारद करणारा 'भाऊबळी'

हा सिनेमा जयंत पवार यांच्या ज्या कथेवर आधारित आहे ती कथा- 'सहाशे बहात्तर रूपयांचा सवाल, अर्थात युद्ध आमचे सुरू'. 

Updated: Sep 17, 2022, 12:09 PM IST
हसत खेळत गारद करणारा 'भाऊबळी' title=

मिताली मठकर, झी मिडीया, मुंबई : विनोद हा निव्वळ हसवण्यासाठीच नसतो तर कधी कधी एखाद्या गंभीर, महत्त्वपूर्ण किंवा विसंगतीवर भाष्य करताना ते थेट आणि सहज करण्याऐवजी मुद्दाम विनोदाचा आधार घेतला जातो... कारण त्याचा होणारा परिणाम हा अधिक खोल असतो. जे सांगायचंय ते थेट सांगितलं तर अनेकदा त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असते. म्हणजेच जे सांगायचंय ते कितीही महत्त्वाचं असलं तरी त्याचं स्वरूप उघड असल्यामुळे पाहणारा-वाचणारा त्याला आधीच सरावतो. मनाची तयारी करतो. परिणामी त्याची तीव्रता कमी होते. पण तोच आशय जरा वेगळ्या पद्धतीने हसत-खेळवत सांगितला तर त्याचा  परिणाम थेट आघात करतो... विचार करायला भाग पाडतो... हेच  'ब्लॅक ह्युमर'.. 'डार्लिंग' सिनेमा पाहतानाही ब्लॅक ह्युमरचा अनुभव आला होता आणि आता नुकताच 'भाऊबळी' पाहतानाही मला तोच अनुभव अधिक जोरकसपणे आला. 

हा सिनेमा जयंत पवार यांच्या ज्या कथेवर आधारित आहे ती कथा- 'सहाशे बहात्तर रूपयांचा सवाल, अर्थात युद्ध आमचे सुरू'. ही कथा वाचतानाच खरं तर त्यातला 'ब्लॅक ह्युमर' आपला कब्जा घेत असतो. ही कथा सरधोपटपणे वाचली तर त्यातल्या कळीच्या जागा  कदाचित सहजपणे लक्षात येत नाहीत. कथेचा बाज वरकरणी विनोदी असल्यामुळे पटकन ती विनोदी कथाच वाटते, पण या विनोदी शैलीच्या आडून जयंत पवार यांनी प्रखर सामाजिक भाष्य केलं आहे. 

कथेतील हाच 'ब्लॅक ह्युमर' दिग्दर्शक समीर पाटील यांनी 'भाऊ-बळी' सिनेमातही अचूक पकडलाय. किंबहुना सिनेमात तो अधिक प्रखरतेने दृश्यमान झाला आहे. छोट्या छोट्या प्रसंगातून अधोरेखित झाला आहे. सिनेमात असे अनेक प्रसंग आहेत, जे पाहताना कदाचित प्रेक्षक सहज हसतीलही... मात्र ते प्रसंग एवढे सहज घेण्यासारखे नाहीत. त्याच्या आतला गर्भितार्थ कळला की तेच प्रसंग अधिक अंगावर येतात. 

सिनेमाची कथा आहे भाऊ आवळस्कर आणि बळी जंगम यांच्यामधील संघर्षाची. हा संघर्ष सुरू झाला आहे एका बिलावरून. 'बिल दिलं की नाही दिलं' या द्विधावस्थेतून सुरू झालेलं भाऊ आणि बळी यांच्यातील हे युद्ध फ्लॅट संस्कृती आणि झोपडपट्टी यांतील सामाजिक-सांस्कृतिक दरी कधी अधोरेखित करतं तेच कळत नाही. मात्र हे सारं घडत जातं ते ब्लॅक ह्युमरच्या अंगाने. जयंत पवार यांच्या मूळ कथेबरहुकूम समीर पाटील यांनी सिनेमाची एकूण मांडणीही वरकरणी विनोदीच ठेवली आहे. मात्र त्यातला गंभीर आशय हरवणार नाही याचीही पूरेपूर काळजी घेतलीय. 

कथेतील जवळपास सगळीच पात्र आपल्याला सिनेमातही भेटतात. त्यातही किशोर कदम, मनोज जोशी, रसिका आगाशे, हृषीकेश जोशी ही पात्रं ठसठशीतपणे लक्षात राहतात. जयंत पवार यांनीच आपल्या सिनेमाची पटकथा-संवाद लिहिल्याने ही पात्र हुकमीच उतरलीत. मात्र ही पात्रं सिनेमात साकारणाऱ्या कलाकारांनीही या पात्रांची नस नेमकी सापडलीय.  

या कथेतले-सिनेमातले भाऊ आणि बळी खरंतर आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात आणि त्यांच्यातही वेगवेगळ्या पातळ्यांवर सतत युद्ध सुरूच असतं. या युध्दात फक्त आपण कुणाच्या बाजूचे, हे महत्त्वाचं!