लुप्त झालेल्या भारतीय चित्त्याची कहाणी

भारतात लवकरच आफ्रीकन चित्ते आणले जाणार आहे. पण भारतात असलेल्या चित्तांचं अस्तित्व कसं संपुष्टात आलं. जाणून घ्या.

Updated: Sep 15, 2022, 06:22 PM IST
लुप्त झालेल्या भारतीय चित्त्याची कहाणी title=

अमित गडगे, मुंबई : भारतात आता आफ्रिकेतून चित्ते आणले जाणार आहेत. आतापर्यंत आपल्या किंवा आपल्या आधीच्या पिढीनं हा प्राणी फक्त टिव्हीत किंवा प्राणी संग्रहालयातच पाहिलाय. पण कधीकाळी आपल्या देशातही चित्ते होते. या चित्त्यांना आशियायी चित्ते म्हणून स्वतंत्र ओळख होती. चित्ता या प्राण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा प्रचंड वेग. ताशी ८० ते १२० किमी वेगानं धावणारा हा प्राणी. याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं नाव. कारण जगभरात या प्राण्याला चित्ता याच नावानं ओळखलं जातं. इतर प्राण्यांपेक्षा भारतीय चित्ता लवकर लुप्त झाला. त्याला अनेक कारणं आहेत. 

वाघ आणि बिबट्याच्या तुलनेत चित्त्याची वयोमर्यादा कमी आहे अवघी १० ते १२ वर्षे. भारतात पाळीव प्राणी म्हणून चित्त्याचा वापर केला जात होता. अकबराच्या प्राणीसंग्रहालयात ९ हजार चित्ते होते असा उल्लेख आहे. हरणांची शिकार करण्यासाठी काही शिकारी चित्त्यांचा वापर करत असत. जंगलातून पकडण्यात आलेल्या चित्याला ६ महिन्यातच प्रशिक्षित केलं जाई. वाघाप्रमाणे त्याला ठेवण्यासाठी पिंजऱ्याची गरज भासत नसे. त्याच्या गळ्यात साखळदंड लावून त्याला बांधून ठेवलं जाई. १८व्या शतकात चित्ते खरेदीचा व्यापार तेजीत होता. पाळीव चित्त्याची त्या काळातील किंमत १५० ते २५० रुपये एवढी होती तर जंगली चित्ता अवघ्या १० रुपयांना मिळत असे. मात्र हे पाळीव चित्ते कधीच प्रजनन करत नसत.  

१८८०साली विशाखापट्टणमध्ये ओ.बी.एरव्हीन नावाचा गव्हर्नरचा एजंट चित्त्याच्या हल्ल्यात मारला गेला. हा चित्ता विजयानगरमच्या राजाचा पाळीव चित्ता होता. या घटनेनंतर चित्त्याला ब्रिटिश सरकारनं हिंस्र पशुंच्या यादीत टाकलं आणि चित्ता मारणाऱ्याला इनाम घोषित केला. हा इनाम मिळवण्यासाठी चित्त्यांची बेसुमार शिकार झाली. सुंदर कातडीसाठीही असंख्य चित्ते मारले गेले.  १९४७ साली छत्तीसगडच्या कोरिया (सध्याचं वैकुंठपूर) संस्थानचे संस्थानिक राजा रामानुज प्रताप सिंह यांनी शेवटच्या ३ भारतीय चित्त्या्ंची शिकार केल्याची नोंद बाँबे नॅचरल हिस्ट्री सोसायटीत आहे.   

१९५१-५२मध्ये भारतीय चित्त्याला नामशेष झाल्याचं घोषित करण्यात आलं. यानंतरही कोरिया तसंच सरगुजा संस्थानात चित्त्यांचा वास्तव्य असल्याचं बोललं गेलं मात्र हा प्राणी परत कोणालाच दिसला नाही. आता बलुचिस्तान, अफगाणिस्तान, इराण या देशांत आशियायी चित्ते आहेत. मात्र त्यांची संख्याही अत्यल्प आहे. चित्त्याची ही प्रजाती पुन्हा देशात नांदवण्यासाठी भारत आणि इराणमध्ये चर्चा सुरु होती. भारत त्या बदल्यात इराणला बंगाल टायगर आणि आशियायी सिंह भेट देणार होता.  मात्र इराणमध्येही चित्त्यांची संख्या कमी झाल्यानं तो सौदा फिस्कटला. 

आता भारत सरकार आफ्रिकन चित्ता देशात आणणार आहे. शनिवारी नामिबीयातून ८ चित्ते एका विशेष विमानाने मध्यप्रदेशात येतील. कदाचीत ही प्रजाती आपल्या देशात नांदेलही. पण लुप्त झालेल्या चित्त्यापासून धडा घेत सरकारनं इतर वन्य जीवांचीही तेवढीच काळजी घ्यावी ही अपेक्षा.