व्हिएतनाम : पृथ्वीवर अनेक रहस्यमय गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गुहेबद्दल सांगणार आहोत जी जगातील सर्वात रहस्यमयी गुहा मानली जाते. ही गुहा इतकी मोठी आहे, ज्यामध्ये अनेक बहुमजली इमारती बांधल्या जाऊ शकतात, असा दावा केला जातो.
ही गुहा इतकी मोठी आहे की त्यात 40 मजल्यापर्यंत इमारती बांधता येतील. आम्ही व्हिएतनाममध्ये असलेल्या 'सोन डोंग' गुहेबद्दल तुम्हाला माहिती देतोय. ही गुफा मध्य व्हिएतनामच्या जंगलात आहे. सोन डोंग गुहेची एकूण लांबी 9 किलोमीटर आहे आणि त्यात सुमारे 150 विविध लेणी आहेत.
या गुहेच्या आत झाडे-वनस्पतींपासून जंगल आणि नद्यांपर्यंत सर्व काही आहे. ही दशलक्ष वर्षे जुनी गुहा 2013 मध्ये प्रथमच पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, दरवर्षी फक्त 250-300 लोकांना याठिकाणी जाण्याची परवानगी आहे.
ही गुहा 1991 मध्ये 'हो खानह' नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने शोधून काढली होती, परंतु त्या वेळी पाण्याच्या प्रचंड गर्जना आणि गुहेतील अंधारामुळे आत जाण्याचं धाडस कोणीच करू शकलं नव्हतं.
आंतरराष्ट्रीय स्तरावर या लेणीला 2009 साली मान्यता मिळाली, जेव्हा ब्रिटीश रिसर्च असोसिएशनने या गुहेची प्रथमच झलक जगाला दाखवली. नंतर 2010 मध्ये, शास्त्रज्ञांना 200 मीटर उंच भिंत ओलांडून गुहेच्या आत एक मार्ग सापडला, ज्याला 'व्हिएतनाम वॉल' असंही म्हणतात.
या गुहेत जाण्यासाठी प्रति व्यक्ती तिकीट सुमारे दोन लाख रुपये आहे. गुहेत जाणाऱ्या पर्यटकांना पहिले सहा महिने प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना किमान 10 किलोमीटर चालणं आणि सहा वेळा रॉक क्लाइंबिंग शिकवले जाते. त्यानंतरच त्यांना गुहेत नेलं जातं.