चीन : चीनमधील प्राणीसंग्रहालयात असणाऱ्या बासी प्रसिद्ध पांडाचा ३७ व्या वर्षी मृत्यू झाला आहे.
बासी हा जगातील सर्वात वयस्कर पांडा म्हणून ओळखला जात होता. काळा आणि पांढऱ्या रंगाचा हा पांडा दिसायला मोठा आणि अतिशय देखणा होता.
फुझोऊ भागात असणाऱ्या रिसर्च अँड एक्सचेंज सेंटरमध्ये त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या कार्यक्रमाचे लाईव्ह ब्रॉडकास्टिंगही करण्यात आले. १९९०मध्ये झालेल्या पहिल्या आशियायी खेळांच्या स्पर्धेचा शुभंकरही बासी पांडावरून तयार कऱण्यात आले होते. बासी ला प्राणीसंग्रहालयात एखाद्या सेलिब्रिटींसारखी वागणूक दिली जात असे. त्याचा वाढदिवसही धूमधडाक्यात साजरा केला असे.
फुओझुमधील प्राणीसंग्रहालयात बासीचे वास्तव्य होते. जंगलात राहत असताना हा पांडा एका नदीत पडला होता. त्यावेळी त्याला यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले व पुन्हा त्याच प्राणीसंग्रहालयातच ठेवण्यात आले. तो ज्या ठिकाणी सापडला त्या परिसरावरून त्याचे नाव बासी ठेवण्यात आले. १९८७ साली बासी अमेरिकेतील सॅन डिएगो येथील प्राणीसंग्रहालयातही काही काळासाठी वास्तव्याला होता.