Niger Crisis: युद्ध, गदारोळ, सत्तापालट , हल्ला, मतभेद हे असेच शब्द मागील काही वर्षांपासून जागतिक स्तरावरही ऐकायला मिळत आहेत. अप्रिय घटनांचं हे सत्र थांबण्याचं नावच घेत नसताना आता भारत सरकारनंही एका महत्त्वाच्या मुद्द्यात लक्ष घातल्यां पाहायला मिळत आहे. आफ्रिका खंडातील नाइजर या देशातील तणावाच्या परिस्थितीवर सध्या भारतीय यंत्रणाही नजर ठेवून आहेत. सध्या नाइजरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील जनता रस्त्यांवरव आली असून, येथील लष्करानं राष्ट्राध्यक्षांना पदावरून हचवत देशातील सत्ता बळकावली आहे. ज्यामुळं तणावात आणखी भर पडताना दिसत आहे.
भारताकडून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर वाढता तणाव पाहता तिथं असणाऱ्या भारतीयांसाठी काही मार्गदर्शक सूचना तातडीनं जारी करण्यात आल्या आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तिथं असणाऱ्या भारतीय नागरिकांना आहे त्या परिस्थितीत लवकरात लवकर देश सोडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काही काळासाठी परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर नाइजरमध्ये जाणंही टाळा असे निर्देशही देण्यात आले आहेत.
नाइजर येथील भारतीयांसाठी जारी करण्यात आलेल्या सूचनेमध्ये परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं, 'नाइजरमध्ये सध्याची परिस्थिती अतिशय तणावपूर्ण असून, भारतीयांना जितकं लवकर शक्य असेल तितकं, आहे त्या परिस्थितीत त्यांनी देश सोडण्याचा प्रयत्न करा. सध्याच्या घडीला नाइजरमध्ये विमानसेवाही बंद आहेत. त्यामुळं रस्ते मार्गानं देश सोडताना प्रचंड काळजी घ्या, सतर्क राहा.'
मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्या नाइजरमध्ये साधारण 250 भारतीय अडकल्याची माहिती आहे. त्यामुळं त्यांना या देशातून बाहेर काढणं मंत्रालयाची प्राथमिक आणि प्राधान्याची जबाबदारी राहणार आहे. देशातील धोका पाहता सध्या तिथ जाण्याचे बेत असल्यास ते तूर्तास रद्द करावेत असं आवाहनही केंद्रीय यंत्रणेनं दिलं असून, येथील परिस्थिती पूर्ववत होत नाही तोवर नाईजर न गाठण्याचा सल्ला दिला आहे. सध्या नाइजरची राजधानी नियामी येथे असणाऱ्या दूतावासामध्ये भारतीय नागरिकांना आपली नोंदणी करण्यास सांगण्यात आलं आहे. यासाठी आपात्कालीन दूरध्वनी क्रमांक जारी करण्यात आला असून, तिथं असणआऱ्या नागरिकांना कोणतीही शंका असल्यास त्यांना या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क करणअयाची विचारणा करण्यात आली आहे. दुतावासाचा दूरध्वनी क्रमांक आहे, (+ 227 9975 9975).
मागील काही दिवसांपासूनच नाइजरमध्ये अशांततेचं वादळ आलं असून, आता लष्करानं राष्ट्रपतींना पदावरून हटवत तिथं सत्तापालट केल्यामुळं परिस्थिती आणखी चिघळली आहे. जगातील या देशाला सध्या इतरस कोणतंही राष्ट्र मदतीचा हात देत नाहीये. ज्यामुळं नाइजरच्या सर्व सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. नाइजरचे राष्ट्रपती मोहम्मद बजौम हे मुळचे त्या भागातील नसून, ते अरब वंशाचे असल्यामुळं संपूर्ण कार्यकाळातच त्यांचा विरोध झाला होता. आता हा देश नेमका शांत कधी होणार यावर संपूर्ण जगाच्या नजरा असतील.