Interesting Facts : शालेय आयुष्याचा टप्पा ओलांडून आपल्यापैकी अनेकजण पुढे आलेले असतात. किंबहुना जेव्हा हा टप्पा ओलांडून आपण मोठे होतो तेव्हा भूतकाळ आठवून आपणच नकळत हसू लागतो. तुमच्या शालेय जीवनातील काही आठवणी आहेत का, असा प्रश्न विचारला असता तुमचं काय उत्तर असेल? बरीच उत्तरं सुचतील ना? असो, यामध्ये एक बाब हमखास असेल ती म्हणजे परीक्षांचा निकाल आणि शिक्षकांचा शेरा.
परीक्षा दिल्यानंतर शिक्षकांच्या हाती जाणारी उत्तरपत्रिका आणि त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती, हे सर्वकाही त्यात आलंच. कारण, उत्तरपत्रिका हाती आल्यानंतर चांगले गुण मिळाले तर ठीक, पण कमी गुण आणि लाल शाईच्या पेनानं दिलेला 'पालकांनी येऊन भेटा' हा शेरा विद्यार्थ्यांची भंबेरी उडवतो. हा शेरा लाल रंगातच का दिला जातो, किंबहुना शिक्षक लाल रंगाच्याच पेनाचा वापर का करतात? याचा विचार तुम्ही कधी केलाय का?
तुम्हालाही एकदातरी वाटलं असेलच ना, की आपणही शिक्षकांसारखं लाल पेन वापरून इतरांना शेरा द्यावं. कारण, शिक्षकांच्या हाती अभ्यासाच्या गोष्टी तपासतेवेळी लाल रंगाचंच पेन असतं. परिणामी काळ्या किंवा निळ्या रंगाच्या पेनचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पेनबद्दल कायमच कुतूहल वाटतं. या कुतूहलपूर्ण प्रश्नांची साचेबद्ध उत्तरं नाहीत. पण, तर्क लावायचा झाल्यास विद्यार्थ्यांच्या मनात आपणही लाल पेन वापरावं अशी इच्छा असते. त्यांना कधी अशी संधी मिळाली तर होणारा आनंदही गगनात मावेनासा होतो.
शिक्षक जेव्हाजेव्हा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासतात तेव्हातेव्हा ते लाल रंगाच्या पेननंच मार्क किंवा शेरा देतात. जेणेकरून विद्यार्थ्यांची उत्तरं आणि शिक्षकांचा शेरा या दोन्ही गोष्टी एकसारखे दिसत नाहीत. कारण, विद्यार्थी परीक्षा देताना काळ्या किंवा निळ्या रंगाचं पेन वापरतात. बरं आणखी एक कारण म्हणजे लाल रंगाच्या शाईचं पेन आणि त्याचा शेरा विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांबाबतचा दराराही कायम राखून ठेवतो. आहे की नाही गंमत?
तुम्ही कधी शालेय आयुष्यात शिक्षकांची भूमिका बजावलीये का?
सहसा काही शाळांमध्ये असा एक दिवस असतो, जेव्हा विद्यार्थीच शिक्षकांच्या भूमिकेत आणि त्यांच्या वेषात असतात. अशा वेळी अनेकांचंच हे स्वप्न साकारही होतं. जिथं शाळेतल्या बाई किंवा सरांप्रमाणं हातात लाल रंगाचा पेन घेऊन इतक विद्यार्थ्यांना चक्क शेरा दिला जातो. त्या दिवशी होणारा आनंद काही औरच असतो... नाही का?