Viral News : वाढत्या वयाची चेहऱ्यावर दिसणारी चिन्हं आणि शरीरावर होणारे परिणाम अनेकांच्याच चिंतेचा विषय ठरतात. याच वाढत्या वयाला लपवण्यासाठी धनाढ्य मंडळी तर जगभरातील कैक उपाय आजमावून पाहतात. असाच एक माणूस मागील काही दिवसांपासून लक्ष वेधत आहे. या माणसाला म्हणे अनंत काळासाठी जगायचं असून, त्यासाठी त्यानं प्रयत्नही सुरू केले आहेत. गजगंज श्रीमंती असणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे ब्रायन जॉन्सन.
जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत गणला जाणारा ब्रायन कॅलिफोर्नियामध्ये राहतो. त्याचं वय पन्नाशीकडे झुकत असलं तरीही आपण कायम 18 वर्षांच्याच मुलाप्रमाणं दिसावं यासाठी तो कोट्यवधींचा खर्चही करत आहे. 47 वर्षीय अब्जाधीश आणि बायो हॅकर ब्रायन जॉन्सनच्या मते त्यानं त्याचं वय यशस्वीरित्या 5.1 वर्षांनी कमी केल्याचा दावा केला असून, तो कैक नवे प्रयोग करताना दिसत आहे.
वय घटवण्याच्या त्याच्या या प्रकल्पाला 'प्रोजेक्ट ब्लू प्रिंट' असं नाव देण्यात आलं असून, यामध्ये 30 डॉक्टर सातत्यानं त्याच्यावर लक्ष ठेवत आहेत. ब्रायनचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर कमाल विश्वास असल्यामुळं त्यानं या मोहिमेला आला Don`t Die मध्ये रुपांतरित केलं आहे. चार वर्षांपूर्वी ब्रायन अतिशय स्थूल, निराश व्यक्तींसारखाच होता. पण, आता मात्र त्याला पाहून यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही.
जाणून आश्चर्य वाटेल पण, त्याचं हृदय एखाद्या 18 वर्षांच्या तरुणाप्रमाणं काम करतं. तर, त्याच्या शरीरातील बोन मिनरल डेन्सिटीचं प्रमाण अवघ्या 30 वर्षांच्या व्यक्तीइतकं आहे. या साऱ्यामागे एका अल्गोरिदमची मोठी भूमिका असून, याच अल्गोरिदमनं आपली इतकी काळजी घेतल्याचं ब्रायन सांगतो. या संपूर्ण प्रक्रियेला वादाचं वलयही आहे. कारण, अमरत्वाच्या प्रयत्नांत असणाऱ्या ब्रायननं आतापर्यंत कैक प्रयोग केले असून, त्यानं एका 17 वर्षीय तरुणाच्या रक्तातील प्लाझ्माचा वापर स्वत:च्या शरीरात हा प्लाझ्मा वापरून याच माध्यमातून तो वाढतं वय रोखू पाहणार आहे. पण, त्याचं हे तंत्र फायदेशीर नसून अमेरिकेतील एफडीएनंसुद्धा या प्रक्रियेतून शरीराला नुकसान पोहोचू शकतं असं म्हटलं आहे.
ब्रायन जॉन्सन स्वत:चं वय जैसे थे ठेवण्यासाठी दरवर्षी पाण्यासारखा पैसा खर्च करतो. हा खर्चाचा आकडा साधारण 17 कोटींच्या घरात असून, त्यानं वय कमी करण्यासाठी डीएनए इडिटिंगचंही तंत्र वापरल्याचं म्हटलं जातं. शरीरातील प्रत्येक अवयवाचं परीक्षण केलेला ब्रायन जॉन्सन हा जगातील एकमेव व्यक्ती आहे. सकाळी 4.30 वाजता दिवस सुरू करून राच्री 8.30 वाजता दिवस संपवणाऱ्या या व्यक्तीची स्वत:वरील प्रेम साऱ्या जगासाठीच चर्चेचा विषय आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.