Viral Video: सर्कशीत प्राण्यांचा सहभाग करत त्यांचा एखाद्या वस्तूप्रमाणे वापर करण्याला प्राणीप्रेमींनी नेहमीच विरोध केला आहे. प्राण्यांविरोधात होणारे हे अत्याचार रोखले जावेत यासाठी जगभरात अनेक ठिकाणी आंदोलनंही करण्यात आली आहेत. काही देशांमध्ये आता हे प्रकार थांबले आहेत. मात्र अद्यापही काही देश सर्कशीत प्राण्यांचा वापर करत त्यांचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहेत. दरम्यान, चीनमधील सर्कशीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत सिंह (Lion) सर्कस सुरु असतानाच पिंजऱ्यातून पळ काढताना दिसत आहे. सिंहांच्या करामती पाहून मनोरंजन करुन घेणारे प्रेक्षक यानंतर मात्र जीव मुठीत घेऊन धावताना दिसत आहेत.
हेनान प्रतांतील लुओयांग शहरात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत सिंह प्रेक्षकांपासून दूर उभारण्यात आलेल्या लोखंडी पिंजऱ्यातून बाहेर पळताना दिसत आहेत. सिंहाना सूचना देणारे दोन कलाकार यावेळी सिंहाना काठीच्या सहाय्याने सूचना कऱण्याचा प्रयत्न करत होते. पण सिंग पिंजऱ्याभोवती फिरत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
एका सिंहाला परफॉर्मर गोल हुपमधून उडी मारण्यास सांगतो. यानंतर सिंह बरोबर उडी मारतो. पण हुपमध्ये अडकतो आणि ते आपल्यासोबत ओढत नेतो.यानंतर सिंह घाबरतो आणि हुप गळ्यात अडकलेल्या स्थितीत घेऊन धावपळ करु लागतो. यानंतर पिंजऱ्यात ठेवण्यात आलेल्या स्टुलावरुन उडी मारुन सिंह जाळ्यातून बाहेर येतो. दोन सिंह पिंजऱ्यातून बाहेर आल्याचं पाहताच प्रेक्षकांची मात्र चांगलीच भंबेरी उडते आणि ते सैरावैरा पळू लागतात.
Luoyang, Henan, China
Everything went wrong!
It is clear that these animals do not want to do these silly tricks. Leave the animals alone and let them live their lives in peace.
I think these lions look skinny. How are they punished now? Beating and starving?#animalcruelty pic.twitter.com/ypkV4HNx7c
— We Are Not Food (@WeAreNotFood) April 16, 2023
ट्विटरला We Are Not Food या पेजवर हा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. "सर्व काही फसलं आहे. या प्राण्यांना हे मूर्ख प्रकार आवडत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे. या प्राण्यांना एकटं सोडा आणि शांततेत जगू द्या. हे सिंह फारच बारीक दिसत आहेत. त्यांना कशाप्रकारे शिक्षा दिली जात आहे? मारहाण आणि भुकेलं ठेवून?", अशी कॅप्शन याला देण्यात आली आहे.
Daily Mail मधील वृत्तानुसार, एक सिंह यावेळी रस्त्यावर पोहोचला होता. दरम्यान अधिकाऱ्यांनी त्याला पुन्हा पडकलं आणि सर्कशीत नेलं. सुदैवाने सिहांनी कोणावरही हल्ला केला नाही.