'तू खूप सुंदर आहेस...', विमानात मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्यालाच जबरदस्ती केलं किस

विमानात एका प्रवाशाने चक्क पुरुष कर्मचाऱ्यालाच किस केल्याची घटना समोर आली आहे. ही प्रवासी दारुच्या नशेत होते. चौकशी केली असता आपण वाइन पिऊन झोपला होतो, त्यामुळे काही आठवत नाही असं त्याने सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2023, 03:39 PM IST
'तू खूप सुंदर आहेस...', विमानात मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्यालाच जबरदस्ती केलं किस title=

विमानात लघुशंका करण्यापासून ते प्रवाशांमध्ये आपापसात झालेली हाणामारी अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांत चर्चेला आल्या होत्या. यामधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातच आता विमानात एका प्रवाशाचं लैंगिक शोषण झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डेल्टा एअरलाइन्समध्ये हा प्रकार घडला आहे. विमानातील एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटची गळाभेट घेत जबरदस्ती किस केल्याचा आरोप केला आहे. तसंच कॅप्टनचा फूड ट्रे तोडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. 

न्यूयॉर्क पोस्टने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. त्यानुसार 10 एप्रिल रोजी मिनेसोटा येथील विमानात 61 वर्षीय फर्स्ट क्लास प्रवासी डेविन एलन बर्क यांनी पुरुष फ्लाइट अटेंडंटच्या गळ्यावर किस केला. 

झालं असं की, टेकऑफच्या आधी डेविड यांना ड्रिंक हवं होतं. त्यांनी ड्रिंकची मागणी केली असता फ्लाइट अटेंडंटने रेड वाइन सर्व्ह करण्याची वेळ निघून गेल्याचं टीसी नावाच्या फ्लाइट अटेंडंटने सांगितलं. त्यावर डेविड यांनी म्हटलं की "ठीक आहे, म्हणूनच मला तुम्ही लोक आवडता. मला माझं प्री डिपार्चर ड्रिंक का मिळू शकत नाही?".

विमानाने टेकऑफ केल्यानंतर डेविड यांनी ड्रिंक देण्यात आलं. यानंतर अटेंडंट डेविड यांचा ट्रे घेण्यासाठी आला असता डेविडने हँडशेक केला आणि नंतर त्याच्या मागून चालत निघाला. त्यांनी टीसीला म्हटलं की, तू किती सुंदर आहेस. त्यावर फ्लाइट अटेंडंटने त्यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी मी तुला किस करू शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर प्लाइट अटेंडंटने नाही असं उत्तर दिलं. यानंतर डेविड यांनी ठीक आहे, गळ्यावर करतो असं सांगत त्याला जबरदस्ती पकडून किस केलं. 

यानंतर फ्लाइट अटेंडंट चिडला आणि डेविड यांना केबिनच्या मागे घेऊन गेला. यावेळी एका दुसऱ्या क्रू मेंबरने त्यांनी कॅप्टनचा जेवणाचा ट्रे तोडला असल्याची माहिती दिली. संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पायलटने विमानतळाशी संपर्क साधला आणि सगळा घटनाक्रम सांगितला. 

यादरम्यान डेविड यांनी तीन ग्लास वाईन प्यायली होती आणि झोपले होते. एफबीआयने त्यांची चौकशी केली असता, मला लक्षात नाही. मी पहिली वाइन प्यायल्यानंतर झोपलो होतो अशी माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.