Viral Video : 'प्रेम...' कितीही नाही म्हटलं तरीही हे प्रेम आपल्या जीवनात वेगवेगळ्या रुपांमध्ये येतं आणि आयुष्य समृद्ध करून जातं. हे प्रेम, प्रेमाची भावना प्रत्येक व्यक्तीसाठी तितकीच हवीहवीशी असते. या प्रेमाच्या प्रवासात अनेक चढ- उतार येतात. त्यातून काही नाती तरून पुढं जातात तर, काही नाती मात्र काळाच्या ओघात दुरावतात आणि मग हक्काची माणसं परकी होतात.
जागतिक स्तरावरील एका परफॉर्मन्स आर्टिस्ट असणाऱ्या marina abramovic सोबत तसंच झालं. 70 च्या दशकादरम्यान ज्या व्यक्तीवर तिनं जीवापाड प्रेम केलं तो तिचा जोडीदार/ पार्टनर Ulay 20 वर्षांहून अधिक काळानंतर अचानक तिच्यासमोर आला आणि त्या क्षणी तिला बोलायला एकही शब्द सुचला नाही.
काही वर्षांपूर्वी “A minute of silence” या कलाविष्कारादरम्यान मरिनानं तिची कला सादर केली. यावेळी अनेक अनोळखी व्यक्ती तिच्यापुढं येऊन मिनिटभरासाठी बसून जात होती. एकाशी शब्दाचा संवाद नसतानाही मरिनाच्या डोळ्यात पाहून जणू त्यातला प्रत्येकजण खूपल काही सांगत होता. हतबलता, मत्सर, प्रेम, आनंद, क्षीण अशा अनेक भावना तिच्यासमोर आलेल्या प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर दिसली. त्यानंतर एक क्षण असा आला जिथं समोर आलेल्या व्यक्तीला पाहून मरिना थक्क झाली होती.
70 च्या दशकात मरिनानं ज्या व्यक्तीवर अतोनात प्रेम केलं, ज्याच्यासोबत कलेचा नजराणा सादर केला तोच Ulay तिच्यासमोर आला होता. तो आला, तिच्यासमोर बसला आणि एका क्षणात जणू ती 20 वर्ष मागेच गेली होती. तिनं आणि त्यानंही एकमेकांशी संवाद साधलाच नाही, पण त्या दोघांचेही डोळे खूप काही सांगून जात होते. मरिनाच्या भावनांचा बांध फुटला आणि कलाविष्कारादरम्यानच तिच्या डोळ्यांतून पाणी घरंगळू लागलं. Ulay सुद्धा सारंकाही संपल्याच्या भावनेनं तिच्याकडे पाहत होता, तिनं दोन्ही हात पुढे केले आणि त्यानंही तिच्या हातात हात दिला. एका क्षणासाठी तिथं प्रचंड शांततेचं वातावरण पाहायला मिळालं.
प्रेमाच्या माणसाचा कैक वर्षांनंतर प्रत्यक्षास समोर पाहून मरिनाला झालेला आनंद आणि नातं तुटल्याच्या वेदना अशा संमिश्र भावना तिच्या आणि त्याच्याही चेहऱ्यावर पाहायला मिळाल्या आणि काही मिनिटांत तो तिच्यासमोरून निघून गेला. मरिनाच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी येतच राहिलं. सोशल मीडियावर या कार्यक्रमादरम्यानचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
Ulay नं वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तर, मरिना आजही कलेपोटी अनेक कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळतात. प्रेमाचं नातं कितीही जुनं झालं तरीही ते विस्मरणात जात नाही हेच या व्हिडीओतून पुन्हा पाहायला मिळालं.