Divorce Case: अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असतं असं म्हणतात. आपल्या नातेवाईकांनाच नाहीच तर अनेकजण अगदी अनोळखी व्यक्तींसाठीही अवयवदान करतात. मात्र ब्रिटनमध्ये अवयवदानासंदर्भातील एक विचित्र प्रकार समोर आला आहे. पत्नीचा जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपली किडनी (मुत्रपिंड) दान केली होती. यामुळे ही महिला वाचलीही. मात्र आता घटस्फोटानंतर या व्यक्तीने पत्नीला 'माझी किडनी परत कर' अशी मागणी केली आहे. किडनी परत कर किंवा पैसे दे असं या नवऱ्याने घटस्फोटानंतर पत्नीला सांगितलं आहे.
घटस्फोटाचं हे प्रकरण नुकतेच कोर्टात सुनावणीसाठी आल्याचं वृत्त 'डेली स्टार'ने दिलं आहे. रिचर्ड बटिस्ता नावाच्या व्यक्तीने 1990 साली डोनेल नावाच्या तरुणीशी लग्न केलं. रिचर्ड आणि डोनेल या दोघांना 3 मुलं आहेत. 2001 साली डोनेलची प्रकृती खालावल्याने तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं असताना तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. किडनी प्रत्यारोपण केलं नाही तर डोनेलचा जीव वाचवता येणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळेस रिचर्डने आपली एक किडनी पत्नीला दान केली होती. मात्र त्यानंतर या दोघांमधील नातं फिस्कटलं. वारंवार होणारे वाद, मतभेद यामुळे या ऑप्रेशननंतर 4 वर्षांनी डोनेलने रिचर्डला घटस्फोट दिला. यामुळे रिचर्ड फारच निराश झाला.
घटस्फोटानंतर तब्बल 19 वर्षांनी आता रिचर्डने कोर्टात याचिका दाखल केली आहे. पत्नी डोनेलचे इतर कोणाबरोबर तरी प्रेमसंबंध आहेत, असा दावा रिचर्डने केला आहे. आमच्या घटस्फोटामधील हेच खरं कारण होतं. आता माझ्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने माझी किडनी परत करावी किंवा त्या मोबदल्यात मला पैसे द्यावेत, अशी याचिकाच रिचर्डने कोर्टात दाखल केली आहे. किडनीच्या मोबदल्यात रिचर्डने आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडून तब्बल 1.2 मिलियन पाऊंडची मागणी केली आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 12 कोटी 58 लाख रुपये इतकी होते. मात्र अशापद्धतीने एकदा दान केलेला अवयव परत मागता येतो का?
आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्यारोपणाच्या माध्यमातून एकदा दान करुन शस्त्रक्रीयेद्वारे किडनी दान केल्यानंतर ती परत शरीरामधून काढता येत नाही. ही किडनी काढायची म्हटलं तर डोनेलचं पुन्हा ऑप्रेशन करावं लागेल. मात्र यामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण होईल. डोनेलची एकही किडनी सक्रिय नसल्याने किडनीसंदर्भातील कोणतंही ऑप्रेशन तिच्यासाठी जीवघेणं ठरु शकतं. किडनीला आता धक्का जरी लागला तरी डोनेलचा मृत्यू होऊ शकतो असं सांगितलं जात आहे. कोर्टामध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर प्रकरण ऐकून घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी कोर्टातील मॅट्रोमोनियल रेफरी जेफरी यांनी रिचर्डने पुन्हा पूर्वाश्रमीच्या पत्नीकडून दान केलेली किडनी मागणं हे कायदेशीर दृष्ट्या तसेच मानवी मुल्यांच्या दृष्टीने चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणीची सुनावणी सध्या सुरु आहे.