अमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी

मंदीचं मोठं संकट, २ कोटी २० लाख बेकार

Updated: Apr 17, 2020, 01:22 PM IST
अमेरिकेत एका दिवसात साडेचार हजार बळी title=

ब्युरो रिपोर्ट :  अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर असून २४ तासांत जवळजवळ साडेचार हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अमेरिकेत बेकारीचं अभूतपूर्व संकट कोसळलं असून तब्बल २ कोटी २० लाख लोक बेकार झाले आहेत.

अमेरिकेत रोज हजारो नागरिकांचा बळी

चीनच्या वुहानमध्ये कोरोनाची साथ सुरु झाली. कोरोनाचं चीनमधलं केंद्र नंतर युरोपमध्ये सरकलं. इटली, स्पेन, फ्रान्स या देशांत मोठ्या प्रमाणात कोरोना फैलावल्यानंतर हे केंद्र अमेरिकेत सरकलं आणि गेले काही दिवस अमेरिकेत कोरोनामुळे दररोज हजारो नागरिकांचा बळी जात आहे.

जॉन हॉपकीन युनिव्हर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोरोना बळींची संख्या झपाट्यानं वाढून ती आता ३५ हजारांच्या जवळ पोहचली आहे. तर कोरोनाची लागण तब्बल ६ लाख ६७ पेक्षा अधिक नागरिकांना झाली आहे.

न्यूयॉर्कमध्ये कहर

अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर आहे. न्यूयॉर्कमध्ये तब्बल १२ हजारांवर नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

अमेरिकेत बेकारीचे अभूतपूर्व संकट

अमेरिकेत कोरोनाचं संकट जसं मोठं आहे, तसंच आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसमोर आता आर्थिक मंदीचं संकटही मोठं आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प आहेतच, पण उद्योगांवरचं संकट एवढं मोठं आहे की दररोज बेकारांची संख्या वाढतच चालली आहे.

गुरुवारी आलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या आठवड्यात ५२ लाख लोकांनी बेकारी भत्त्यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. म्हणजे एका आठवड्यात अमेरिकेत ५२ लाख बेकारांची भर पडली आहे. अमेरिकेत बेकारीचा आकडा आजवरचा सर्वोच्च असून तब्बल २ कोटी २० लाख अमेरिकन बेरोजगार झाले आहेत. आर्थिकदृष्ट्या सामर्थ्यवान असलेल्या अमेरिकेतील ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. यापूर्वी २००८-०९ च्या जागतिक मंदीतही अमेरिकेत एवढी भीषण आर्थिक स्थिती नव्हती.

 

चीनमध्ये मृतांचा आकडा वाढला

चीनच्या वुहानमध्ये कोरोना मृतांची संख्या नव्यानं सांगण्यात आली आहे. आढावा घेतल्यानंतर वुहानमधील मृतांच्या संख्येत आणखी १२९० मृतांची नोंद करण्यात आली असून त्यामुळे चीनमधील कोरोना बळींची संख्या ४६४२ एवढी झाली आहे.