रशियन सैनिकाला युक्रेनियन नागरिकाची कोपरखळी; बस की आता, परत रशियाला नेऊ का?

बरं हे ऐकून तो रशियन सैनिकही हसतो. 

Updated: Mar 2, 2022, 11:51 AM IST
रशियन सैनिकाला युक्रेनियन नागरिकाची कोपरखळी; बस की आता, परत रशियाला नेऊ का?  title=
द गार्डियन

नवी दिल्ली : जागतिक पटलावरल सध्या कोणत्या गोष्टीची चर्चा आणि त्याहीपेक्षा कोणत्या गोष्टीबाबत चिंता असेल, तर ती आहे रशिया आणि युक्रेन या दोन्ही राष्ट्रांमध्ये धुमसणारं युद्ध. (Russia Ukraine Conflit)

बलाढ्य रशियानं काही दिवसांपूर्वीच अखेर युद्धाचं रणशिंग फुंकलं आणि युक्रेनच्या राजधानीसह इतर भागांमध्ये भयंकर हल्ले घडवून आणले. 

मिसाईल हल्ले करत युक्रेनचा कणा मोडू पाहणाऱ्या रशियन सैन्यानं लष्करी कारवाया करणं सुरु ठेवलेलं असतानाच युक्रेनमध्ये आता नागरिक, महिला, अगदी लहान मुलंसुद्धा रशियन हल्ल्याला उत्तर देण्यासाठी पुढं येत आहेत. 

सोशल मीडिया आणि वृत्तमाध्यमांच्या मदतीनं संपूर्ण जगात या दोन्ही देशांमध्ये सुरु असणाऱ्या घडामोडी पाहता येत आहेत. अशातच एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात पाहिला जात आहे. 

हा व्हिडीओ आहे एका सर्वसानान्य युक्रेनियन नागरिकाचा, ज्यानं रशियन सैनिकालाच उपरोधिक टोला लगावला आहे. 

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक युक्रेनियन नागरिक आपल्या वाहनानं जात असताना वाटेत असणाऱ्या रशियन रणगाड्याशेजारी येऊन थांबतो. आपल्याच देशात येणाऱ्या सैन्यांना तो प्रश्न करतो, ज्यावर आपल्या रणगाड्यातील इंधन संपल्याचं उत्तर रशियन सैनिक त्याला देतात. 

सैनिकांचं हे उत्तर ऐकताच तुम्हाला टो, करुन रशियात नेऊ का? अशी कोपरखळी तो मारतो. बरं हे ऐकून तो रशियन सैनिकही हसतो. 

देशात सुरु असणाऱ्या संघर्षाविषयी प्रश्न केला असता, युक्रेन जिंतकंय आणि रशिया शरणागती पत्करतंय असंही तो नागरिक म्हणताना दिसतो. 

देशात पेटलेला वणवा दाहक असला तरीही आम्हीही नमतं घेणाऱ्यांपैकी नाही, असाच त्याचा आत्मविश्वास सध्या नेटकऱ्यांचीही मनं जिंकत आहे. 

बलाढ्य रशियन सैन्यासमोरून ताठ मानेनं पुढे जाणारा हा नागरिक त्याची ओळख जगासमोर न येताच सर्वांची मनं जिंकून जात आहे.