नीरव मोदीचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला

नीरव मोदीला कोर्टाचा दणका

Updated: Nov 7, 2019, 08:19 AM IST
नीरव मोदीचा जामीन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने फेटाळला title=

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करून देश सोडून पळून गेलेल्या नीरव मोदीला न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चार दशलक्ष पौंडांची हमी देण्याची, तसंच स्वत:ला नजरकैदेत ठेवण्याची तयारी फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीने दाखवली आहे. मात्र या हमीनंतरही ब्रिटनच्या न्यायालयाने बुधवारी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

पीएनबी गैरव्यवहारात आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज पाचव्यांदा फेटाळण्यात आला आहे. ३० ऑक्टोबरला त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. नीरवने म्हटलं होतं की, तो अस्वस्थ आणि निराश आहे. नीरव मोदी गेल्या 7 महिन्यांपासून लंडनच्या वांड्सवर्थ जेलमध्ये आहे. भारताने त्याला भारतात पाठवण्याची मागणी केल्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला १९ मार्चला अटक केली होती.

नीरव मोदीच्या वकिलांनी म्हटलं होतं की, त्याची कोठडी फार मोठी झाली आहे. त्यामुळे त्याचं नुकसान होत आहे. जामिनासाठी तो न्यायालयाची कोणतीही अट मान्य करण्यासाठी तयार आहे. नीरवच्या वकिलांनी इलेक्ट्रोनिक डिवाइसच्या माध्यमातून नजरकैदेत ठेवण्याचा आणि चार दशलक्ष पौंडांची हमी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण वेस्टमिंस्टर मजिस्ट्रेट कोर्टाने म्हटलं की, नीरव मोदी एका मोठ्या घोटाळ्यातील आरोपी आहे. जामिनाची रक्कम वाढवल्याने त्याची पळून जाण्याची शक्यता कमी नाही होत. नीरव मोदीचा जामिन अर्ज यूके हायकोर्टाने देखील फेटाळला आहे.