मुंबई : मासा खाण्यासाठी शहाणा तरी विषाची परीक्षा देणार नाही. पण जगात असे खवय्ये आहेत जे मासा चाखण्यासाठी त्याच्या विषाचीही परीक्षा घेतात. पफर नावाचा मासा जगातला सर्वात विषारी मासा आहे. पण तो खायला एवढा चवदार आहे की, तो खाण्यासाठी लोकं पैसेही मोजतात.
विषाची परीक्षा नकोच असं वडिलधारी सांगतात. पण चवीसाठी लोकं विषाची परीक्षाही घेतात आणि विषारी मासाही चवीने खातात. जपानमध्ये पफर मासा साफ करणं आणि शिजवणं ही एक कला आहे. तुम्ही म्हणाल मासा साफ करणे यात कोणती आलीय कला.... खरं तर पफर मासा हा अतिशय विषारी आहे. हा मासा साफ करण्यासाठी अतिशय कुशल शेफ लागतो. अगदी पाच पाच ते दहा वर्ष हा मासा साफ करण्याचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. मासा साफ करताना त्यातलं विष माशाच्या मांसात पसरु नये याची काळजी घ्यावी लागते. विष पसरू न देता तो मासा साफ करणाऱ्या शेफना जपानसारख्या देशात मोठी मागणी आहे.
मासा वाढताना आम्हाला माहिती असतं की तुमचं आयुष्य आमच्या हातात आहे. त्यामुळं आम्ही खूपच काळजी घेतो. हा मासा खायला खूपच सुरक्षित आहे. तुम्ही तो तयार करताना पाहाल तर तुमचाही विश्वास बसेल, असं एका शेफने या माशाविषयी बोलताना सांगितलं.
जपान, थायलंडसारख्या देशात पफर मासे खाणारा श्रीमंत वर्ग आहे. काही हॉटेल्समध्ये तर पफर मासे साफ करणाऱ्या शेफना बक्कळ पगार मिळतो. पफर माशाची थाळी दिसायलाही सुंदर असते. त्यामुळे विषारी असला तरी एकदा तरी ती चाखायलाच हवी....