Taliban ban Windows in Building : महिलांप्रती समाजात असणाऱ्या समजुती, महिलांना दिलं जाणारं प्राधान्य या साऱ्यासंदर्भात अद्यापही कैक देश मागेच राहिले असून आजही तिथं महिलांना दुय्यम दर्जा दिला जातो. महिलांविरोधातील कायदे या देशात आजही अस्तित्वात असून, त्यापैकीच एक देश आहे अफगाणिस्तान.
तालिबान सरकारची सत्ता आल्या क्षणापासून अफगाणिस्तानातून येणाऱ्या प्रत्येक बातमीनं, प्रत्येक कायद्यानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. असाच एक अजब फतवा पुन्हा एकदा अफगाणिस्तानातील महिलांसाठी नव्यानं अडचणी निर्माण करताना दिसत आहे. महिलांच्या सामाजिक अस्तित्वावर नव्यानं अडचणींचं सावट आणत तालिबान सरकारनं अफगाणिस्तानातील इमारतींमधील घरांना खिडक्या न बांधण्याचे आदेश दिले आहेत.
ज्या घरांमध्ये महिला आहेत त्या घरांना खिडक्या न बांधण्याचे आदेश तालिबाननं दिले आहेत. ज्या घरात महिला आहेत आणि ज्या घरांमधून महिला दृष्टीक्षेपात येण्याची शक्यता आहे अशा घरांसाठी आणि इमारतींसाठी हे निर्देश दिले आहेत. 'अश्लील कृत्यांचा' हवाला देत अफगाणी महिलांचा वावर असणाऱ्या क्षेत्रात घरांना खिडक्या न बनवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तालिबानच्या म्होरक्यानं हे आदेश जारी केले आहेत.
तालिबान सरकारच्या प्रवक्तेपदी असणाऱ्या जबीहुल्लाह मुजाहिदनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती देत, 'नव्या इमारतींमध्ये खिडक्या बांधल्या जाऊ नयेत. घराचं अंगण, स्वयंपाकघर, शेजाऱ्यांच्या विहिरी किंवा महिलांचा वावर असणाऱ्या इतर कोणत्याही भागातून महिला दिसल्या नाही पाहिजेत' हा फतवा जारी केला. थोडक्यात महिलांनी जाहीरपणे बाहेर येऊ नये आणि त्यांना कोणी पाहू नये.
तालिबान सरकारनं यासाठी एक यंत्रणा लागू केली असून, कुठेही महिलांना कोणीही डोकावून पाहणार नाही किंवा महिला घरातून बाहेर डोकावणार नाहीत याची काळजी घेतली जावी असं जाहीर आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, ऑगस्ट 2021 पासून जेव्हा तालिबान सरकारची सत्ता अफगाणिस्तानात आली तेव्हापासूनच तिथं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये महिलांची उपस्थिती कमी होत गेली. तालिबान सरकारनं देशात मुलींच्या शिक्षणावरही निर्बंध लावले असून, इथं त्यांना प्राथमिक शिक्षणापुढे शिकण्याची परवानगी नाही, देशात नोकरीची मुभा नाही. महिलांच्या पेहरावासंदर्भातही तालिबान सरकारनं निर्देश लागू केले असून, त्यात आता आणखी एका निर्बंधाची भर पडताना दिसत आहे.