Hungry student eats artwork of a banana: भूक लागल्यावर मला काहीही सूचत नाही, हे वाक्य तुम्ही अनेकदा तुमच्या ओळखीच्या एखाद्या तरी व्यक्तीकडून ऐकलं असेल. खरोखरच अनेकांना भूक लागल्यावर काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. जोपर्यंत पोटात अन्नाचा घास जात नाही अशा लोकांना काहीही सूचत नाही. बरं भुकेच्या तडाख्यामध्ये खाण्यासारखी कोणतीही गोष्ट दिसली तर आवडी निवडीचा फारसा विचार न करता भूक शमवण्यासाठी ती गोष्ट लोक खातात. मात्र अनेकदा अशा गडबडीमध्ये नंतर खाल्लेल्या गोष्टीबद्दल पश्चातापही होऊ शकतो. असाच काहीसा पश्चाताप दक्षिण कोरियामधील एका विद्यार्थ्याला झाला.
झालं असं की, एका संग्रहालयामध्ये गेलेल्या या विद्यार्थ्याला फार भूक लागली होती. भूकेच्या तडाख्यात त्याने या संग्रहालयात दिसलेलं एक केळ खाल्लं. हे केळ इथं संग्रहालयात कसं आलं, कोणी ठेवलं याचा फारसा विचार त्याने केला नाही. मात्र नंतर हे केळ सर्वसामान्य नव्हतं तर ते एका शिल्पाचा भाग होतं असं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे या शिल्पाची किंमत 98 लाख म्हणजेच जवळजवळ 1 कोटी रुपयांपर्यंत होती. या विद्यार्थ्याने भिंतीवरील शिल्पाचा भाग असलेलं हे केळ खाल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आश्चर्य वाटत असून या मुलाने असा वेडेपणा कसा केला असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नोह हुईन सू असं आहे. व्हिडीओमध्ये हा विद्यार्थी संग्रहालयातील एका भिंतीला चिकटपट्टीने चिटकवलेलं केळ काढून खाताना दिसत आहे. दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सियोलमधील लेउम म्यूझियम ऑफ आर्ट नावाच्या संग्रहालयात हा सारा प्रकार घडला. हे केळ इटालीयन कलाकार मौरिजियो कॅटेलनच्या शिल्पाचा भाग होता. भुकेच्या तडाख्यात हे केळ खाल्ल्यानंतर या विद्यार्थ्याने केळाचं साल पुन्हा भिंतीला चिटकवून ठेवलं.
İtalyan sanatçı Maurizio Cattelan'ın "Comadian" adlı duvara bantlı muz çalışması, karnı acıkan bir öğrenci tarafından yenildikten sonra yeniden duvara bantlandı.
Çalışmanın değeri 120.000 USD olarak belirlenmiştir. pic.twitter.com/x5QAsplC9b
— Wannart (@wannartcom) May 1, 2023
नोह हुईन सूला संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी पकडलं आणि त्याने अशी कृती का केली याबद्दल विचारलं. मी नाश्ता केला नव्हता. त्यामुळे मला भूक लागल्याने मी हे केळ खाल्लं असं नोह हुईन सू असं म्हणाला.
मात्र संग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी या शिल्पामधील या खाल्लेल्या केळ्याच्या ऐवजी नवं केळ चिकटपट्टीने चिटकवलं. अशाप्रकारे या शिल्पामधील केळ भेट दिलेल्या पर्यटकाने खाल्ल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहे. घडलेला प्रकार हा फार काही गंभीर नाही असंही संग्रहालयातील अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.