'कोरोनाची साथ दोन वर्ष तरी जाणार नाही; वास्तव स्वीकारून जगायला लागा'

चीनबाहेर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला दक्षिण कोरिया हा पहिला देश होता. 

Updated: Apr 27, 2020, 01:06 PM IST
'कोरोनाची साथ दोन वर्ष तरी जाणार नाही; वास्तव स्वीकारून जगायला लागा' title=

सेऊल: तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जगातील कोरोनाची साथ आणखी दोन वर्ष तरी जाणार नाही. हे वास्तव आपण स्वीकारले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी दोन वर्ष तरी वाट पाहायला लागेल, असे वक्तव्य दक्षिण कोरियाचे आरोग्यमंत्री किम जँग-लीप यांनी केले आहे. दक्षिण कोरियाने ही बाब जवळपास गृहीत धरली असून आता सरकारकडून तसे निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार आता कामाच्या वेळा बदलणे, सार्वजनिक वाहनांनी प्रवास करताना काळजी घेणे आणि क्विक रेस्टॉरंट मिल्स अशा गोष्टींवर भर दिला जात आहे. 

परदेशात प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी काही दिवस कामावर जाणे टाळावे, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तसेच बहुतांश काम हे व्हीडिओ कॉन्फरन्सिंग , ऑनलाईन ट्रेनिंग आणि सोयीस्कर (फ्लेक्झिबल) वेळा पाळून करावे, असा सल्लाही सरकारने दिला आहे.

१६ मे नंतर भारतात कोरोनाचा नवा रुग्ण नाही; नीती आयोगाच्या सदस्याचा दावा

सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांनी प्रवास करताना नागरिकांनी मास्क वापरावा. तसेच रिकाम्या रांगेतील आसने निवडावीत. टॅक्सीचालकांना मोबाईलद्वारे पेमेंट करावे, असे पर्याय सुचवण्यात आले आहेत. याशिवाय, रेस्टॉरंटसमध्ये जायचे असल्यास त्याठिकाणी कमीतकमी वेळ घालवावा. खाण्यासाठी शक्यतो स्वत:चेच ताट वापरावे. हॉटेलमालकांनी ग्राहकांपासून दूर बसावे. तसेच टेक-अवे किंवा होम डिलिव्हरीला प्राधान्य द्यावे. 

शॉपिंग मॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ग्राहकांनी किमान १ मीटरचे अंतर ठेवून उभे राहावे. दुकानदारांनीही ग्राहकांना विनवणी करण्यात वेळ वाया घालवू नये, असे सरकारी निर्देशांमध्ये सांगण्यात आले आहे. 
याशिवाय, सेऊलमध्ये चर्च आणि क्रीडा सुविधांसाठी निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, तरीही काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

सरकारने चर्चमध्ये जाण्यासाठी आणि क्रीडा सुविधांसाठी निर्बंध काहीप्रमाणात शिथिल केले आहेत. मात्र, बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे काही भागांमध्ये पुन्हा कोरोनाचा टक्का वाढू शकतो, असा सरकारचा अंदाज आहे. 

चीननंतर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेला दक्षिण कोरिया हा पहिला देश होता. २८ फेब्रुवारीला दक्षिण कोरियात सर्वाधिक ९०९ रुग्ण आढळून आले होते. मात्र, यानंतर दक्षिण कोरियाने वेगाने नागरिकांच्या चाचण्या करत कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणली होती. त्यामुळे ५२ कोटी लोकसंख्या असलेल्या दक्षिण कोरियात अवघ्या १०,७०८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. या काळात दक्षिण कोरियाने लॉकडाऊनपेक्षा सोशल डिस्टन्सिंग पाळून दैनंदिन व्यवहार सुरु ठेवण्यावर भर दिला होता. दक्षिण कोरियात आता कोरोनामुळे होणारे मृत्यू थांबले आहेत. २४ एप्रिलला देशात अवघे १० नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही संख्या शुन्यावर येईल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.