Trending News : भविष्यात मशीन्स माणसांना जन्म देणार आहेत. महिलांना गर्भधारणेपासून आराम मिळेल, लेबर पेन झेलावा लागणार नाही. विज्ञान संवादक हाशेम अल घैली ( Hashem Al-Ghaili) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात कृत्रिम भ्रूण केंद्र (EctoLife Artificial Womb Facility) दाखवण्यात आलंय. यात शेकडो कृत्रिम गर्भांची निर्मिती करण्यात आलीय, ज्याद्वारे मशिन्स माणसांना जन्म देऊ शकतात. मशिन्स फक्त जन्म देणार नाहीत तर तुमच्या मोबाईलमधल्या अॅपद्वारे तुम्हाला तुमच्या मुलात कोणते गुण, कोणत्या सवयी हव्यात हेही तुम्ही फीड करु शकणार आहात. थोडक्यात तुम्ही तुमच्या मुलाला माणूस म्हणून सजवू शकणार आहात. नेमकं कृत्रिम भ्रूण सेंटर कसं असेल आणि कृत्रिम गर्भातून नवजात अर्भक (New Born Baby) कसा जन्म घेतील पाहुयात.
मशिन्स माणसांना जन्म देणार?
कृत्रिम गर्भ केंद्राला एक्टोलाईफ (EctoLife) असं नाव देण्यात आलं आहे. ही एक कॉम्प्युटर मॅट्रीक्स प्रणाली (Computer Matrix System) आहे. एक्टोलाईफमधील बर्थ पॉड्समध्ये (Birth Pods) कृत्रिम भ्रूण विकसित केलं जाईल. गर्भाप्रमाणे रचना असणाऱ्या बर्थ पॉड्समध्येच भ्रूणाची वाढ होईल. कृत्रिम भ्रूणाच्या जीन्समध्ये हवे ते बदल करता येतील. हे बर्थ पॉड्स घरातही ठेवता येणार असून सौरऊर्जेवर हे बर्थ पॉड्स चालतील.
प्रत्येक दिवशी भ्रूणाची होणारी वाढ तुम्ही पाहू शकाल. मुलांना कोणत्या सवयी असाव्यात हे तुम्ही फीड करू शकता. आपलं अपत्य फुटबॉलपटू बनावं अशी इच्छा असेल तर पालक भ्रूणाच्या जीन्समध्ये तसा बदल करू शकतील. प्रत्येक कृत्रिम केंद्रात 400 बर्थ पॉड्स असतील. महिलेच्या गर्भाबाहेर बर्थ पॉड्सद्वारे मशिन माणसाला जन्म देईल.
विज्ञान संवादक हाशेम अल घैलींच्या म्हणण्यानुसार गर्भ केंद्रात कृत्रिम भ्रूणांची शेती केली जाईल आणि तंदुरुस्त, बुद्धिमान बालकांचा जन्म होईल. अर्थात कृत्रिम गर्भ केंद्र ईक्टोलाईफ ही एक निव्वळ संकल्पना किंवा काल्पनिक विज्ञान कथा आहे. असं तंत्रज्ञान जगात कुठेही विकसित झालेलं नाही किंवा होतही नाहीये. पण या तंत्रज्ञानावर संशोधन व्हायला हवं म्हणूनच हाशेम यांनी एक व्हिडीओ जारी केलाय ज्याची आता चर्चा रंगलीय.