रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी गेल्या अनेक महिन्यांपासून अंदाज वर्तवले जात आहेत. त्यातच आता पुतिन यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं वृत्त समोर आलं आहे. टेलीग्राम ग्रुप जनरल एसवीआरने यासंबंधी वृत्त दिलं आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर पुतिन बेडरुममध्ये खाली जमिनीवर कोसळले होते. सुरक्षा अधिकाऱ्याने त्यांना जमिनीवर बेशुद्धावस्थेत पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली असा दावा आहे. हे टेलीग्राम चॅनेल नेहमीच पुतिन यांच्या प्रकृतीसंबंधी वृत्त देत असतं. रशियामधील निवृत्त गुप्तचर अधिकारी आणि क्रेमिलनमधील अधिकाऱ्यांकडून आपण ही माहिती मिळवतो असा त्यांचा दावा आहे.
टेलीग्राम ग्रुपचं हे वृत्त ब्रिटनमधील न्यूज आउटलेट्स द मिरर, जीबी न्यूज आणि द एक्सप्रेसनेही प्रसिद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुतिन रविवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास बेडरुममधील जमिनीवर जेवणाच्या बाजूला खाली पडलेले होते. जेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांनी खाली जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज ऐकला तेव्हा ते धावत आले असता हा प्रकार उघडकीस आला.
जनरल एसवीआरने केलेल्या दाव्यानुसार, गेल्या काही दिवसांत झालेल्या विदेश भेटी आणि इतर कार्यक्रमांमध्ये पुतिन यांच्या जागी त्यांच्या बॉडी डबलने सहभाग घेतला आहे. पुतिन यांना त्यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या विशेष अतिदक्षता सुविधेत नेण्यापूर्वी डॉक्टरांना त्यांनी सीपीआर देत पुन्हा एकदा शुद्धीत आणावं लागलं असा दावा यात कऱण्यात आला आहे.
"ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी पुतिन यांना सीपीआर देत पुन्हा एकदा शुद्धीत आणलं," असं वृत्त या चॅनेलने दिलं आहे. पुतिन यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने ह्रदय पुन्हा एकदा सुरु झालं आणि त्यांना शुद्ध आली असं सांगण्यात आलं. दरम्यान यावर क्रेमलिनकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. अधिकाऱ्यांनी याआधी 71 वर्षीय पुतिन यांनी कोणत्याही वैद्यकीय समस्या असल्याचे दावे फेटाळले आहेत.
जनरल एसवीआरने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं असून कोणताही पुरावा सादर केलेला नाही. आपल्या वृत्तात त्यांनी सांगितलं आहे की, "रशियामधील वेळेनुसारस रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी पुतिन यांच्या निवासस्थानी सुरक्षेत तैनात असणाऱ्या अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्षांच्या बेडरुममध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. दोन सुरक्षा अधिकारी तात्काळ धावत गेले असता पुतिन खाली पडलेले होते. त्यांच्या शेजारी असणारं जेवणाचं टेबलही खाली पडलेलं होतं". निवासस्थानी असणाऱ्या डॉक्टरांना तात्काळ रुममध्ये बोलावण्यात आलं होतं.
पुतिन यांच्या निवासस्थानी वैद्यकीय उपचारासाठी विशेष सोय असून तिथे त्यांना हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.