Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे

Updated: Feb 24, 2022, 08:13 PM IST
Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम title=

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे. भारताला याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागू शकतात. 

रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका जागतिक अर्थव्यवस्थेला बसणार आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 100 डॉलर्स प्रतिबॅरलच्या पुढे पोहोचल्या आहेत. 2014 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाचे दर तीन आकड्यांवर गेले आहेत. 

युद्ध सुरू, पेट्रोल भडकणार
तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या भारताला याचा मोठा फटका बसू शकतो. कच्चा तेलाच्या किंमती बॅरलमागे 10 डॉलर्सनी वाढल्या की देशाच्या अर्थव्यवस्थेला तब्बल 12 लाख कोटी डॉलर्सचा फटका बसतो. या परिस्थितीत देशात पेट्रोल डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमती गगनाला भिडतील. 

यामुळे देशात महागाईचा दरही कमालीचा वाढेल. रशियातून जगाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूचा पुरवठा होतो. त्यामुळे जगाला सीएनजी, पीएनजीचा मोठा तुटवडा सहन करावा लागेल. 

युद्ध सुरू, गहू महागणार 
रशिया गव्हाचा सर्वात मोठा पुरवठादार देश तर युक्रेन गहू निर्यातीत चौथ्या क्रमांकाचा देश आहे. जगातला 25 टक्के गहू या दोन्ही देशांमधून निर्यात केला जातो. त्यामुळे आधीच महामारीमुळे अन्नधान्याच्या किंमती वाढल्या असताना आता युद्धामुळे या किंमतीचा भडका उडण्याची भीती आहे. 

रशिया आणि युक्रेन तणावाचा परिणाम जगभरातील व्यापारावर होताना दिसत आहे. भारतातील व्यापरावरही याचा परिणाम दिसून येत आहे.

युद्ध सुरू, सोने गगनाला भिडणार 
युद्धकाळात सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसून येतो. त्या पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी जगभरात कमालीची वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं 60 हजार रूपये तोळ्याच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. 

युद्धाचा शेअर बाजाराला फटका
जागतिक शेअर बाजारांवर या युद्धाचा मोठा फटका दिसून आलाय. परदेशी संस्थांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या विक्रीमुळे भारतीय शेअर बाजार कमालीचा कोसळला. निफ्टी 800 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला तर सेन्स्केक्स 2500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला.  

बिअर महागणार?
याशिवाय बिअर कंपन्याही संकटात आल्या आहेत. कारण बिअर बनवण्यासाठी लागणाऱ्या बार्लीचं सर्वाधिक उत्पादन हे या दोन्ही देशांमध्येच होतं. उन्हाळ्यात बिअरला सर्वाधिक मागणी असते. आणि आता ऐन उन्हाळ्यात बिअरच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5 हजार किलोमीटर लांब सुरू असलेल्या या युद्धाचा बिअर कंपन्यांनासह भारताच्या बिअरच्या ग्राहकांनाही फटका बसणार आहे.