Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. मागील 10 महिन्यांहून अधिक काळापासून या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता रशियामधून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir putin) यांच्या धोरणांवर टिका होण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुतिन यांनी एक कठोर निर्णय घेतला आहे. रशिया सरकाने जारी केलेल्या एका आदेशामध्ये युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरुन रशियन सरकावर टीका करणाऱ्यांची संपत्ती जप्त केली जाईल असं म्हटलं आहे. हा प्रस्ताव कनिष्ठ सभागृहामध्ये संमतही करण्यात आला आहे. या प्रस्तावामध्ये पुतिन यांच्यावर टिका करणाऱ्यांविरोधातही कारवाई केली जाईल असं म्हटलं आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पुतिन यांच्यावर रशियामधूनच टिका होऊ लागली. पुतिन यांनी युक्रेनवर हे युद्ध लादल्याचं मत असलेल्यांची रशियामधील लोकांची संख्या मागील काही महिन्यांमध्ये वाढल्याचं चित्र दिसत आहे. मात्र पुतिन यांनी या टीकेकडे कानाडोळा करत युक्रेनवरील हल्ले सुरुच ठेवले. या युद्धाला विरोध असलेल्या अनेक रशियन नागरिकांना आपलाच देश सोडावा लागला. मात्र आता सातत्याने होणाऱ्या या टीकेवरुन पुतिन यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष व्याचेस्लाव वोलोदिन यांनी या प्रस्तावासंदर्भात बोलताना, "देशातील काही नागरिकांना वाटत आहे की आपल्या लष्करी जवानांचा, अधिकारांचा अपमान करणे आणि शत्रूचं सर्मथन करणं सहज शक्य आहे. मात्र अशाप्रकारे टीका करणाऱ्यांचे परदेशात हितसंबंध आहेत," असं म्हटलं आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार रशियन लष्कराने युक्रेनमधील सर्वात मोठा मिठाचा साठा असलेल्या पूर्वेकडील सोलेदर नावाच्या शहरावर ताबा मिळवला आहे. युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये अनेक धक्के खावे लागल्यानंतर रशियाला सोलेदरच्या माध्यमातून मोठे यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. रशिया आणि युक्रेनमधील रक्तरंजित संघर्षाचे केंद्रबिंदू ठरत असलेल्या सोलेदर शहरावर रशियाने ताबा मिळवला आहे, असं रशियन संरक्षण मंत्रालयाने सांगितलं.
मात्र युक्रेनमधील दोनेत्स्क प्रांतातील सोलेदर शहरावर रशियाने ताबा मिळवल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला असून लढाई अजून सुरु असल्याचं म्हटलं आहे. दोनेत्स्क प्रांत हा त्याच चार प्रांतांपैकी एक आहे ज्याचा रशियाने सप्टेंबर महिन्यात आपल्या भूभागामध्ये समावेश करुन घेत असल्याची घोषणा केली होती. मागील एका महिन्याहून अधिक काळापासून सोलेदर शहरामध्ये दोन्ही बाजूकडील सैन्याकडून एकमेकांच्या फौजांवर हल्ले केले जात आहेत.