Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी?

अमेरिका-रशियामध्ये युद्ध पेटणार, युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Updated: Mar 1, 2022, 08:39 PM IST
Russia Ukraine War : युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी? title=

नवी दिल्ली : एकीकडे युद्धाचा मोठा भडका उडाला असताना आता त्यानंतरच्या परिणामांची चर्चा सुरू झाली आहे. दुस-या महायुद्धानंतर जसं जग दोन गटांत विभागलं गेलं, तसंच काहीसं पुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशा वेळी सगळं जग कायमच युद्धाच्या छायेत राहील.

रशियामध्ये असलेल्या अमेरिकन नागरिकांनी लवकरात लवकर देश सोडावा, असा संदेश अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी दिलेत. त्यामुळे रशियात असलेल्या अमेरिकन नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचा अर्थ यातून काढला जातोय. याचे दोन अर्थ निघतात.

अमेरिका-रशियात युद्ध पेटणार?

एकतर अमेरिका-रशियामध्ये नजिकच्या काळात अणूयुद्धाची ठिणगी पडू शकते. किंवा अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवलं जाण्याची भीती बायडेन यांना आहे. या दोन्ही शक्यता एकच संकेत देत आहेत. ते म्हणजे युक्रेन युद्ध शमल्यानंतरही त्याचे पडसाद दीर्घकाळ बघायला मिळणार आहेत. 

युरोप-अमेरिकेनं रशियावर आतापर्यंतचे सर्वात कठोर निर्बंध लादल आहेत. रशियाची सर्व बाजूंनी कोंडी करण्यात येते. संयुक्त राष्ट्रांमधल्या रशियाच्या 12 अधिका-यांना हेरगिरीच्या आरोपात अमेरिकेनं देशाबाहेर हाकललंय. अशा वेळी अमेरिकेच्या निर्बंधांखाली दबलेल्या अन्य देशांची रशियाला साथ मिळू शकेल.

युक्रेन युद्धामुळे जगाची पुन्हा विभागणी

उत्तर कोरिया, इराण आणि व्हेनेझुएला या देशांवर अमेरिकेचे कडक आर्थिक निर्बंध आहेत. त्यामुळे हे तिन्ही देश एकमेकांना तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करतात. आता त्यांना रशियाची तगडी साथ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय अमेरिकेचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनही या नव्या आघाडीला पाठबळ देऊ शकतो. 

युक्रेनवरील हल्ल्यानंतर जग तिस-या महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलंय. दुस-या महायुद्धानंतर अमेरिका-रशियाचं शितयुद्ध जगानं पाहिलंय. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर या छुप्या युद्धाची समाप्ती झाली. आता पुतीन यांच्या आक्रमक धोरणांमुळे जग पुन्हा दोन गटांमध्ये विभागलं जाणार, हे निश्चित आहे. युक्रेन युद्ध ही कोल्ड वॉर टू पॉइंट झिरोची सुरूवात ठरणार आहे.