पिट्सबर्ग : कोरोनाची लस शोधणाऱ्या शास्त्रज्ञाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमेरिकेच्याा पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये बिंग लू हे शास्त्रज्ञ रिसर्च असिस्टन्ट प्रोफेसर होते. बिंग लू यांचा मृतदेह त्यांच्या घराजवळ आढळला. गोळ्या झाडल्यामुळे बिंग लू यांच्या डोक्यावर, गळ्यावर, धडावर आणि हाता-पायांना जखमा झाल्या होत्या, अशी माहिती रॉस पोलीस विभागाने दिली.
बिंग लू यांची हत्या करणाऱ्याने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे. बिंग लू यांची हत्या केल्यानंतर या व्यक्तीने लू यांच्या घराबाहेर असलेल्या स्वत:च्याच कारमध्ये आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. या दोन्ही व्यक्ती एकमेकांना ओळखत होत्या, असाही पोलिसांना संशय आहे. चीनचे नागरिक असल्यामुळे बिंग लू यांची हत्या झाल्याची शक्यता तपास यंत्रणांनी फेटाळून लावली आहे.
बिंग लू यांच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी झालो आहोत. बिंग लू यांच्या कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीने दिली आहे. बिंग लू हे कोरोनाची लस शोधण्याच्या शेवटच्या टप्प्यात आले होते. कोरोना लसीच्या संशोधनात त्यांना महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या होत्या, असंही युनिव्हर्सिटीने सांगितलं आहे.
बिंग लू यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही त्यांचं अर्धवट राहिलेलं संशोधन पूर्ण करू, अशी प्रतिक्रिया युनिव्हर्सिटीच्या डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटेशनल ऍण्ड सिस्टिम्स बायोलॉजीमध्ये, बिंग लू यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी दिली.