नवी दिल्ली : १४ फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. भारत-पाकिस्तान सीमेवरील वाढत्या तणावामुळे पंजाबमध्ये आपली विमानसेवा ४ मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याची अधिकृत घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. पाकिस्तानी सीमेवर सियालकोटमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. सीमेवर होणाऱ्या गोळीबारामुळे तेथे वित्त तसेच जिवीत हानी होत असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानसेवा बंद केली असल्याने सर्व घरेलू आणि आतंरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे पाकिस्तानमधील विमानसेवा बंद करण्यात आल्याने प्रवाशांना कराची, लाहौर आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी ट्रेनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. विमानसेवा बंद करण्यात आल्याने गाड्यांना अनेक ठिकाणी थांबा देण्यात येणार आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील वाढत्या तणावामुळे भारताकडूनही सध्या सीमावर्ती भागातील सर्व ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील सर्व विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. उत्तर भारतातील बहुतांश विमानतळांवरील नागरी विमानांची वाहतूक तसेच लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, डेहराडून, अमृतसर, चंदीगड आणि जम्मू विमानतळांवरील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु त्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. सध्या भारतीय विमान वाहतूक सुरळित सुरू आहे.