पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, म्हणाले बलात्कारासाठी मोबाईल जबाबदार

इम्रान खान यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे

Updated: Aug 26, 2021, 07:16 PM IST
पाकिस्तानचे पंतप्रधान बरळले, म्हणाले बलात्कारासाठी मोबाईल जबाबदार title=

पाकिस्तान : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. मोबाईलच्या गैरवापरामुळे देशात लैंगिक गुन्हे वाढत आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला आहे. लाहोरच्या ग्रेटर इक्बाल पार्कमध्ये जमावाने एका महिला टिकटॉकर आणि तिच्या साथीदारांना मारहाण आणि गैरवर्तणूक केल्याच्या काही दिवसांनंतर इम्रान खान यांनी हे वक्तव्य केलं आहे. याआधी, इम्रान खान यांनी लैंगिक अत्याचारासाठी छोट्या कपड्यांना जबाबदार धरलं होतं.

लाहोरमध्ये पंजाब शिक्षण परिषदेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासह युवकांना दर्जेदार शिक्षण आणि त्यांचं चारित्र्य घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे. यावेळी बोलतानाच इमरान खाने यांनी मोबालईच्या दुरुपयोगामुळेच लैंगिक गुन्हे वाढत असल्याचं म्टहलं आहे. इमरान खान यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे.

मीनार-ए-पाकिस्तामधली घटना काय होती?

एक महिला टिकटॉकर आपल्या मित्रांसोबत लाहोर इथल्या मीनार-ए-पाकिस्तान या ठिकाणी टिकटॉक व्हिडिओ बनवत होती. यावेळी अचानक 300 ते 400 जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. लोकांनी या महिलेला आणि तिच्या मित्रांना जबर मारहाण केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. इतकंच नाही तर लोकांनी या महिलेला वर उचलून हवेत फेकलं. या दरम्यान जमावाने या महिलेची अंगठी आणि कानातले 'हिसकावले'. त्याच्या साथीदाराचा मोबाईल फोन, ओळखपत्र आणि त्याच्यासोबत असलेले 15 हजार रुपयेही हिसकावले.

ही पाकिस्तानची संस्कृती नाही

मीनार-ए-पाकिस्तानमध्ये घडलेल्या घटनेवर इमरान खान यांनी दु:ख व्यक्त केलं, अशा घटना पाकिस्तानच्या संस्कृती आणि धर्मात नाहीत, असं ते म्हणाले. 'आपल्या देशात यापूर्वी महिलांना जो आदर दिला जात होता, तितका जगात कोणत्याही देशात दिसत नव्हता. पाश्चिमात्य देशांतही महिलांचा इतका आदर होत नव्हता. यापुढे बोलताना त्यांनी म्हटलं, की अशा घटना घडत आहेत कारण आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.

मूळ संस्कृतीपासून दुरावलो

पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, देशात सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ संस्कृतीपासून दूर केलं आहे. स्वातंत्र्यानंतर त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी एका अभ्यासक्रमासह शिक्षण पद्धतीवर काम करायला हवं होतं, पण आपल्या देशात तीन शिक्षण पद्धती होत्या, धार्मिक मदरसे, इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि सरकारी. पूर्वी सरकारी शाळांमधून सर्वोत्तम बुद्धिजीवी निर्माण होत असत, पण नंतर व्यवस्था बदलली आणि खाजगी क्षेत्राने आपल्याला परकीय संस्कृतीचे गुलाम बनवलं.