पाकिस्तानने सीमेवर फौज वाढवली, तोफाही तैनात

काश्मीर प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशाच आली.

Updated: Aug 27, 2019, 05:55 PM IST
पाकिस्तानने सीमेवर फौज वाढवली, तोफाही तैनात title=

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर (Jammu And Kashmir) मधून कलम ३७० (Article 370) हटवल्यानंतर पाकिस्तानच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पाकिस्तान जगभरात हा प्रश्न नेण्याच्या प्रयत्नात आहे. पण प्रत्येक ठिकाणी त्यांना मात मिळत आहे. चीन व्यतिरिक्त कोणताही देश त्यांच्या भूमिकेला पाठींबा देताना दिसत नाही. सर्व प्रयत्न करुन झाल्यानंतर पाकिस्तान आता एलओसीवरील वातावरण बिघडवण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानी सरकारने सीमेवर मोठ्या संख्येत फौज आणली आहे. तसेच सीमेपासून कमी अंतरावर तोफा आणल्या आहेत. 

काश्मीर प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्यानंतरही पाकिस्तानच्या पदरी निराशाच आली.  असे असतानाही पाकिस्तान मागे हटण्यास तयार नाही. पंतप्रधान इम्रान खान यांच्यासहित सर्व नेते आणि क्रिकेटर्स देखील या प्रकरणी उलटसुलट वक्तव्य करत आहेत. सोमवारी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला परमाणु हल्ल्याची धमकी देखील दिली. 
जर हे प्रकरण वाढले तर दोघांकडेही अण्वस्त्र आहेत हे भारताने लक्षात ठेवावे. कारण याचा परिणाम फक्त दोन देशांवरच होणार नाही तर संपूर्ण जगभरात पाहायला मिळेल असेही इम्रान खान म्हणाले. 

जी-७ शिखर संमेलनाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीर मुद्द्यावरून स्पष्ट संदेश दिला. 'आम्ही कोणत्याही देशाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये लक्ष देत नाही, त्यामुळे आमच्या अंतगर्त गोष्टींमध्ये दुसऱ्या कोणीही दखल द्यायचे कष्ट घेऊ नयेत,' असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.