जपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा

जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय.

Updated: Aug 30, 2017, 11:01 PM IST
जपानच्या दिशेनं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा उत्तर कोरियाचा इशारा  title=

मुंबई : जपानच्या दिशेनं मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र डागल्यानंतर उत्तर कोरियानं आणखी क्षेपणास्त्र सोडण्याचा गर्भित इशारा दिलाय. काल सोडलेली क्षेपणास्त्र ही केवळ सुरूवात आहे, आणखी क्षेपणास्त्र येतील असं आश्वासनच उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी दिलंय.

कालच्या क्षेपणास्त्रांमुळे संयुक्त राष्ट्र आणि दक्षिण कोरिया, अमेरिकेचा तिळपापड झालाय. किम जोंग यांची ही कृती अमेरिकेला उकसवण्यासाठी असल्याचं मानलं जातंय. मात्र यामुळे कोरियन प्रदेशातल्या तणावात आणखी भर पडलीये.

उत्तर कोरियानं डागलेल्या या क्षेपणास्त्रांमुळे जपान सावध झालाय. देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या वाजिमा शहरात सुरक्षेची रंगीत तालीम करण्यात आली. यामध्ये 300 नागरिकांनी सहभाग घेतला. यात काही शाळकरी मुलंही सहभागी झाली होती. उत्तर कोरियानं डागलेली खरीखुरी क्षेपणास्त्र वरून गेल्यामुळे या तालिमीला वेगळंच महत्त्व प्राप्त झालंय.

विशेष म्हणजे, ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या पहिल्याच जपान दौऱ्याला उत्तर कोरियानं ही आतषबाजी केलीये. मे यांच्या स्वागतार्थ क्योटोमध्ये पारंपारिक चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. मे यांनी उत्तर कोरियाला रोखण्यासाठी चीननं अधिक मेहनत घ्यावी असं म्हटलं होतं.