Bullet Trains : रेल्वे प्रवास करत असताना त्यादरम्यान येणारे अनुभव अनेकदा हैराण करणारे असतात. वेळ वाचवण्यासाठी म्हणून उत्तम ठरणाऱ्या या रेल्वे प्रवासातही अनेक प्रकार आहेत. मुळात रेल्वेचेच कैक प्रकार आहेत. भारतात सध्याच्या घडीला वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे प्रवाशांच्या अशाच गरजा पूर्ण करत त्यांचा प्रवास अधिक सोपा करण्याचं काम करत आहे, तर तिथे जगाच्या पाठीवर रेल्वे हा आकर्षणाचा विषय ठरवणारा देश म्हणजे जपान.
सुपरफास्ट बुलेट ट्रेन, अचूक वेळात अपेक्षित ठिकाणी पोहोचवणारी बुलेट ट्रेन अशी या ट्रेनची ओळख. या ट्रेनच्या डिझाईनपासून सारंकाही तितकंच कमाल. अशी ही नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त इतर कोणासाठीही न थांबणारी बुलेट ट्रेन नुकतीच तब्बल 17 मिनिटांसाठी थांबली. बरं, ही 'शिंकानसेन' (बुलेट ट्रेन) थांबली ती थांबली, पण त्यामागचं कारण काय तुम्हाला माहितीये?
AFP च्या वृत्तानुसार मंगळवारी सायंकाळी प्रवास करत असताना एका प्रवाशाला नागोया आणि टोक्योदरम्यान ट्रेनमध्ये साधारण 16 इंचांचा एक साप दिसला. त्यानं तातडीनं सुरक्षारक्षकांना याबाबतची माहिती देत सतर्क केलं आणि या सर्व गोंधळात वाऱ्याच्या वेगानं जाणारी बुलेट ट्रेन थांबली.
दरम्यान, हा साप विषारी होता की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. किंबहुना तो ट्रेनमध्ये कसा आला याचीही माहिती मिळू शकली नसल्याची भूमिका जपानमधील मध्य रेल्वे सेवा विभागानं दिली. शिंकानसेन अर्थात या रेल्वेमध्ये प्रवासी पाळीव श्वान, मांजर, कबुतर
आणि इतर काही प्राणी नेण्याची परवानगी आहे. पण, इथं साप मात्र नेता येत नाही. त्यामुळं ट्रेनमध्ये दिसलेला हा साप एखाद्या स्थानकावरून ट्रेनमध्ये आला असावा असं सांगण्यात आलं, आहे.
दरम्यान, ही बुलेट ट्रेन निर्धारित मार्गानुसार ओसाका येथून जाणार होती. पण, या प्रसंगानंतर कंपनीकडून या प्रवासासाठी एका वेगळ्या मार्गाचा अवलंब करण्याचं ठरवलं. ज्यामुळं 17 मिनिटांचा उशिर झाला आणि संपूर्ण रेल्वे यंत्रणेनं तातडीनं निर्णय घेत हा गोंधळ शमवला.