मुंबई : चहाप्रती लोकांचं असणारं वेड हे शब्दांत मांडण्याच्याही पलीकडे आहे. चहा... एक असं पेय ज्याचा एक घोट घेतल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात आणि शेवटही होत नाही. चहामध्ये असणारे वैद्यकिय घटकही तितकेच महत्त्वाचे. सर्दी - पडसं दूर पळवण्यासाठीही हीच चहा फायदेशीर ठरते.
आज International Tea Day 2022 च्या निमित्तानं चहाचं महत्त्वं जाणून घेण्यासाठी चला, काही काळ मागे जाऊया. भारतात चहाची सुरुवात 18 व्या शतकात झाली. बर्मा, म्यानमान, आसाम या ठिकाणी सीमांत प्रदेशांमध्ये चहाची लागवड सुरु झाली. इंग्रज भारतात आल्यानंतर चहाच्या व्यापाराला आणखी वेग आला. सुरुवातीला चीनमधून चहाच्या लागवडीसाठी बिया मागवल्या जात होत्या.
21 डिसेंबर 2019 ला संयुक्त राष्ट्र संघाकडून मान्यता
जगभरातील चहाचे उत्पादक देश 15 डिसेंबर 2005 पासून दरवर्षी या दिवशी जागतिक चहा दिन म्हणून साजरा केला जात होता. 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या खाद्य आणि कृषी विभागाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांत मांडला गेला. 21 डिसेंबर 2019 ला या प्रस्तावाला मान्यता मिळाली आणि 21 मे हा आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
यंदाच्या वर्षीचा चहा दिवस हा अतिशय खास आहे. कारण, 'Celebrating Tea Around The World' अशी थीम ठेवण्यात आली आहे. जिथं चहा अनेकांची झोप उडवण्याचं काम करते, तिथंच अनेकांसाठी हीच चहा उपजिवीकेचं साधन आहे.
तुमचा विश्वास बसणार नाही, पण चीननंतर भारत चहा उत्पादनातील देशांच्या यादित दुसऱ्या स्थानावर येतो. भारतात लोक दरवर्षी सरासरी 6,200,000 टन चहा पितात.