पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 22, 2023, 08:13 AM IST
पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं title=

Masood Azhar aide Malik Dawood killed: कॅनडा असो वा पाकिस्तान, गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शत्रूंना परदेशात संपवलं जात आहे. अशातच अज्ञात हल्लेखोरांनी भारताच्या आणखी एका शत्रूची हत्या केली. लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक (Malik Dawood) याची वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दाऊद मलिक हा भारतातील मोस्ट वाँटेड जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरच्या (Masood Azhar) खूप जवळ होता. उत्तर वझिरीस्तानमधील मिराली येथे मलिकची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफ याची पाकिस्तानात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दुसरा दहशतवादी आयएसआय एजंट मुल्ला बहूर उर्फ ​​होर्मुझ हासुद्धा पाकिस्तानमध्ये अज्ञात लोकांच्या गोळीबाराचा बळी ठरला होता. त्यानंतर 'जैश-ए-मोहम्मद' या जागतिक दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जवळचा दाऊद मलिकची हत्या करण्यात आली आहे. मसूद अझहर, हाफिज सईद, लखवी आणि दाऊद इब्राहिम इत्यादींना भारत सरकारने यूएपीए (UAPA) अंतर्गत दहशतवादी घोषित केले आहे.

भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला पाकिस्तानी दहशतवादी दाऊद मलिक याची अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मलिक हा लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक होता. पाकिस्तानातील उत्तर वझिरिस्तानमध्ये त्याची हत्या करण्यात आली. पाकिस्तान पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील मिराली भागात मास्क घातलेल्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तो ठार झाला. मलिक यांना एका खासगी दवाखान्यात लक्ष्य करण्यात आले. ही हत्या केल्यानंतर हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले.

दहशतवाद्यांचा भारतविरोधी हत्यार म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानला आता मोठा झटका बसला आहे. दाऊदसारख्या दहशतवाद्याच्या अज्ञात हत्येच्या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. दुसरीकडे, ज्यांनी मलिकची हत्या केली ते गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले. मलिक एका खाजगी दवाखान्यात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्याची हत्या करण्यात आली.