नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये बऱ्याच ब्रँडच्या शीतपेयांची गर्दी बाजारात पाहायला मिळाली. यामध्ये विविध प्रकारच्या आणि चवीच्या शीतपेयांना अनेकांची पसंतीही मिळाली. असं असलं तरीही, रुह अफजा या पेयाला मिळणारी पसंती काही औरच. त्यातही सध्या सुरू असणारा पवित्र रमजानचा महिना आणि त्यामुळे रुह अफजाला असणारी प्रचंड मागणी याविषयीही काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण, यंदाच्या वर्षी सालाबादप्रमाणेच या पेयाला जास्त मागणी असली तरीही बाजारात मात्र त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
हमदर्द या कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार रमजानच्या महिन्यात रुह अफजाचा खप जवळपास २० ते ३० टक्क्यांनी वाढतो. पण, सध्या मात्र खप आणि उत्पादनाचं हे समीकरण काहीसं गडबडलं आहे. पण, लवकरच ही परिस्थिती नियंत्रणात आणणार असल्याचा विश्वासही कंपनीकडून देण्यात आला. मुख्य म्हणजे पाकिस्तानमध्ये रुह अफजाचं उत्पादन घेणाऱ्या हमदर्द कंपनीच्या मालकांनी भारताला मदतीला हात पुढे केल्याचं म्हटलं जात आहे.
भारतातील मुस्लिम धर्मीयांच्या असुविधा होऊ नये यासाठी वाघा बॉर्डरच्या वाटे भारतात रुह अफजाचा पुरवठा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानकडून पुढे करण्यात आला आहे. पाकिस्तानी हमदर्दच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उसामा कुरेशी यांनी यासंदर्भातील ट्विटही केलं होतं, ज्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्याचं पाहायला मिळालं होतं.
Brother @DilliDurAst, we can supply #RoohAfza and #RoohAfzaGO to India during this Ramzan. We can easily send trucks through Wahga border if permitted by Indian Government.
— Usama Qureshi (@UsamaQureshy) May 7, 2019
इफ्तार पार्टीच्या वेळी रुह अफजाच पिण्यास प्राधान्य दिलं जातं. ही जणू एक अलिखित प्रथाच होऊन बसली आहे. मुख्य म्हणजे बाजारपेठेत असणारा हा तुटवडा लक्षात घेता या पेयाची ऑनलाईन विक्रीही सुरू आहे. पण, तेथे मात्र त्यासाठी जास्त किंमत आकारली जात आहे. त्यामुळे सध्या चर्चा ही रुह अफजाचीच होताना दिसत आहे.
दरम्यान, काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार कौटुंबीक मतभेदांमुळे या पेयाचं उत्पादन काही काळासाठी थांबवण्यात आलं होतं. ज्यानंतर आता पुन्हा एकदा उत्पादन पूर्वपदावर आणण्याची तयारी सुरु असून गोष्टी लवकरच पूर्ववत होण्याचं चित्र आहे.
अनेकांच्याच पसंतीचं रुह अफजा हे पेय १०० वर्षे जुनं आहे. १९०६ मध्ये हाफिज अब्हुल मजिद यांनी या पेयाची सुरुवात केली होती. आयुर्वेदिक विश्वात बऱ्याच प्रचलित असणाऱ्या 'हमदर्द' या ब्रँडकडून हे पेय सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येतं. ज्याची लोकप्रियचा ही दिवसागणिक वाढतच आहे.