27 राज्यं आणि 14 देशांचा जावई; 32 वर्षीय तरुणाने तब्बल 100 तरुणींना फसवलं, Guinness ने नोंद घेतलेला जगातील सर्वात मोठा गुन्हा

Guinness World Record: जगात एक अशी व्यक्ती आहे जिने तब्बल 100 वेळा लग्न केलं आहे. विशेष म्हणजे त्याची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. लग्न केल्यानंतर त्याने तरुणींना घटस्फोटही दिला नाही. जाणून घ्या काय आहे हे प्रकरण....  

शिवराज यादव | Updated: Apr 7, 2023, 04:33 PM IST
27 राज्यं आणि 14 देशांचा जावई; 32 वर्षीय तरुणाने तब्बल 100 तरुणींना फसवलं, Guinness ने नोंद घेतलेला जगातील सर्वात मोठा गुन्हा title=

Guiness World Record: गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये (Guiness World Record) आपल्या नावाची दखल घेतली जावी असं प्रत्येकालाच वाटत असतं. मग त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जातात. सर्वात लांब नखं ते सर्वात मोठी दाढी असे अनेक विचित्र रेकॉर्ड लोकांनी आपल्या नावावर केले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एका अशा व्यक्तीचीही नोंद आहे ज्याने 100 हून अधिक वेळा लग्न केलं आहे. 

या तरुणाने 100 हून अधिक महिलांशी लग्न केलं आहे. हा सर्व लग्नं 1949 ते 1981 दरम्यान झाली आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ही लग्नं कोणताही घटस्फोट न घेता झाली आहेत. यासह या व्यक्तीने सर्वाधिक लग्नं करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये Giovanni Vigliotto नावाच्या एका व्यक्तीची गोष्ट सांगण्यात आली आहे. असं सांगितलं जातं की त्याचं खरं नाव जियोवन्नी विगलियोटो नव्हतं. पण शेवटच्या महिलेशी लग्न केलं तेव्हा त्याने याच नावाचा वापर केला होता. 

53 वर्षांचा असताना त्याला पकडण्यात आलं होतं. त्यावेळी त्याने आपला जन्म इटलीमधील सिसिली येथे 3 एप्रिल 1929 मध्ये झाल्याचा दावा केला होता. यावेळी त्याने निकोलई पेरुस्कोव हे आपलं खरं नाव असल्याचं सांगितलं होतं. पण नंतर कोर्टात हजर करण्यात आलं असता वकिलाने त्याचं खरं नाव फ्रेड जिप असून त्याचा जन्म 3 एप्रिल 1936 ला न्यूयॉर्कमध्ये झाल्याचं सांगितलं होतं. 

विगलियोटो याने 1949 ते 1981 दरम्यान 104 ते 105 महिलांशी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे त्याने लग्न केलेली एकही महिला दुसरीला ओळखत नव्हती. त्यांना जियोवन्नी विगलियोटो याच्याबद्दलही फार काही माहिती नव्हतं. असं सांगितलं जातं की, त्याने अमेरिकेतील 27 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि 14 देशांमध्ये ही सर्व लग्नं केली. लग्नं करताना तो कधीही आपली खरी ओळख उघड करत नव्हता. 

विगलियोटो चोरबाजारात महिलांना भेटत असे आणि पहिल्याच डेटवर प्रपोज करायचा. लग्नानंतर तो पत्नी आणि तिच्या महागड्या वस्तू चोरून पळ काढत असे. मी फार दूर राहत असल्याने तू तुझं सर्व सामान घेऊन ये असं तो महिलांना सांगत असे असं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाईटवर सांगण्यात आलं आहे. 

जेव्हा महिला सर्व सामान बांधत असतं तेव्हा जियोवन्नी विगलियोटो ट्रकमध्ये सामान भरुन पळ काढत असे. हे सर्व सामान तो चोर बाजारात विकत असे. इथेच तो दुसऱ्या महिलांना लक्ष्य करायचा. 

जियोवन्नी विगलियोटोविरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र यानंतरही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. पण शेवटी ज्या महिलेला फसवलं होतं तिनेच अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये त्याला पकडलं. या महिलेचं नाव शारोन क्लार्क असं होतं. 

28 डिसेंबर 1981 ला पोलिसांनी जियोवन्नी विगलियोटोला अटक केली, यानंतर त्याच्याविरोधात खटला चालवण्यात आला. त्याला एकूण 34 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामधील 28 वर्षं फसवणूक आणि सहा वर्ष एकाहून अधिक लग्न केल्याप्रकरणी होती. याशिवाय त्याला 3 लाख 36 हजार डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला. वयाच्या 61 व्या वर्षा 1991 मध्ये ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाला.