IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; भारत ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर

IND vs ENG Semifinal: टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टी इंडियाने इंग्लंडचा पराभव करत वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय. 

सुरभि जगदीश | Updated: Jun 28, 2024, 02:00 AM IST
IND vs ENG: बदला घेतलाच! टीम इंडियाची फायनलमध्ये धडक; भारत ट्रॉफीपासून केवळ एक पाऊल दूर title=

IND vs ENG Semifinal: टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अखेर टीम इंडियाने जोरदार धडक दिली आहे. सेमीफायनलच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव करत टी२० वर्ल्डकप २०२२ चा बदला घेतलाय.  या सामन्यात भारताने इंग्लंडचा 68 रन्सने पराभव केला आहे. यानंतर आता शनिवारी दक्षिण आफ्रिकेसोबत टीम इंडियाचा शेवटचा म्हणजेच टी२० वर्ल्डकपचा फायनल सामना रंगणार आहे. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकण्यापासून टीम इंडिया केवळ एक विजय दूर आहे.

T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेल्या 172 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांना कोणतीही मोठी पार्टनरशिप करता आली नाही. इंग्लंडचा निम्मा संघ ५० धावांच्या आत बाद झाला होता. इंग्लंडचा संघ 16.4 ओव्हर्समध्ये अवघ्या 103 धावांवर गारद झाला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 25, जोस बटलरने 23, जोफ्रा आर्चरने 21 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 11 धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी सर्वाधिक विकेट घेतल्या. या दोघांनीही ३-३ विकेट्स घेत विजयामध्ये मोलाचा वाटा दिला. जसप्रीत बुमराहला 2 विकेट्स मिळाल्या तर अक्षरला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

इंग्लंडने जिंकला होता टॉस

इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय इंग्लंडसाठी काही सकारात्मक दिसून आला नाही. टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आणि भारताने 171 रन्स केले. टीम इंडियाच्या डावात पावसाने अनेकदा व्यत्यय आणला असला तरी रोहित शर्माच्या ५७ धावा आणि सूर्यकुमार यादवच्या ४७ धावांच्या जोरावर भारत १७१ धावांपर्यंत मजल मारली. शेवटच्या षटकांमध्ये हार्दिक पांड्याने 23 धावांची तर रवींद्र जडेजाने 17 धावांची खेळी खेळली. या सामन्यात पुन्हा एकदा विराट कोहली फ्लॉप झाल्याचं दिसून आलं.

रोहित शर्माचं सलग दुसरं अर्धशतक

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा बदला घेण्याच्या मूडमध्ये दिसून आला. टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 57 धावा केल्या. ओपनिंगला आलेल्या रोहितने ऑस्ट्रेलियाविरूद्धही ९२ रन्सची खेळी केली होती.सेमीफायनलच्या सामन्यात रोहित विराटची विकेट गेल्यानंतरही डगमगला नाही. एका बाजूने त्याने स्वतःचा खेळ सुरु ठेवला आणि अर्धशतक झळकावलं.

20 महिन्यांनंतर  टीम इंडियाचा बदला अखेर पूर्ण

या विजयासह टीम इंडियाने आपला बदला पूर्ण केला आहे. इंग्लंडच्या टीमने 20 महिन्यांपूर्वी  म्हणजेच 2022 मध्ये टी-20 वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता. ॲडलेडमधील पराभवानंतर रोहित शर्माच्या टीमचे वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगले. यावेळी हिटमॅनच्या टीमने इंग्रजांच्या स्वप्नांचा चुराडा केला आहे.