मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEO

मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.   

शिवराज यादव | Updated: Jun 27, 2024, 08:55 PM IST
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEO title=

पावसाळा म्हटलं की मुंबईकरांना समुद्रकिनारी जाण्याचा मोह आवरता येत नाही. दरम्यान समुद्रकिनारी जाताना काळजी घ्या असं आवाहन वारंवार प्रशासन करत असतं. पण हौसेपोटी अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. दरम्यान असाच काहीसा प्रकार मरीन ड्राईव्हवर घडला आहे. एक महिला पाय घसरुन थेट समुद्रात पडली. सुदैवाने पोलिसांनी धाव घेत महिलेचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

नेमकं काय झालं?

स्वाती कनानी या मुलुंडच्या रहिवासी असून त्या मरीन ड्राईव्हला फिरण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान यावेळी मरीन ड्राईव्हच्या कठड्यावरुन त्यांचा पाय घसरला आणि थेट खाली जाऊन पडल्या. मरीन ड्राईव्हला लावण्यात आलेल्या संरक्षक दगडांवर त्या पडल्या. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी पोलिसांनी धाव घेतली. महिलेच्या सुदैवाने समुद्राला उधाण आलं नसल्याने तिला वेळीच वाचवण्यात पोलिसांना यश आलं. 

दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी सुंदर महल जंक्शन येथे ही घटना घडली. महिलेला वाचवण्यासाठी किरण ठाकरे आणि अमोल दहीफळे समुद्रात उतरले होते. त्यांनी दोरीच्या सहाय्याने महिलेला बाहेर काढलं. दरम्यान व्हिडीओत महिला दगडावर पडली असल्याने तिच्या गालावर जखम झाल्याचं दिसत आहे. तसंच महिला प्रचंड घाबरल्याचंही दिसत आहे. महिलेला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 20 मिनिटं महिलेचं बचावकार्य सुरु होतं. यावेळी महिला पोलीस कर्मचारीही उपस्थित होत्या. त्यांनीच महिलेला रुग्णालयात दाखल केलं.