अमेरिका : टेक्नॉलॉजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी गुगलने सोमवारी आपल्या कर्मचाऱ्यांचा विचार करत 'वर्क फॉम होम'चा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे गुगल कंपनीचे कर्मचारी आता जून २०२१ पर्यंत घरी बसून काम करू शकतील. कंपनीने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा तब्बल २ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून भारतात अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचं सावट दूर होईपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली आहे.
गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना एका इमेलच्या माध्यमातून माहिती दिली आहे. 'मला ठाऊक आहे की माझ्या या निर्णयावर कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया देखीस सारखी असेल. प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्या.' असं ते म्हणाले.
सर्वप्रथम या संदर्भातील माहिती 'द वॉल स्ट्रीट जर्नल'ने दिली. गेल्या अनेक महिन्यांपासून ऑफिस बंद ठेवण्याचा निर्णय अनेक बड्या कंपन्यांनी घेतला आहे. कोरोना माहामारीमुळे टेक्नॉलॉजी क्षेत्रातील काम ऑनलाईनद्वारे चांगल्या मार्गाने सुरू आहे.
दरम्यान, ज्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने ११ मार्च रोजी कोरोना महामारी म्हणून घोषित केली, तेव्हापासून गूगल सारख्या अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाचं सावट दूर होईपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करण्याची सुविधा दिली आहे.