मुंबई : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियटनं सर्वांची चिंता वाढवलीय. WHOनं या व्हेरियंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून हा विषाणू अतिशय चिंताजनक असल्याचं म्हंटलंय. हा व्हेरियंट डेल्टापेक्षा कित्येकपट घातक असल्यानं आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या नव्या व्हेरियंटमुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती व्यक्त होतीय. (Fear of re lockdown due to new corona variant omicron)
कोरोनाची लाट ओसरतेय असं वाटत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातलाय. B.1.1.529 या नावानं ओळखल्या जाणा-या व्हेरियंटला WHOनं ओमिक्रॉन असं नाव दिलंय. द.आफ्रिकेच्या तीन प्रांतात दररोज आढळणा-या 90 टक्के रूग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून येतोय. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी ही संख्या केवळ 1 टक्के होती. त्यावरून ओमिक्रॉन किती वेगानं पसरतोय याची कल्पना येईल.
सगळ्यात आधी 11 नोव्हेंबरला हा व्हेरियंट १ बोत्सवानात आढळून आला. त्यानंतर हाँगकाँग, इस्रायल आणि बेल्जियममध्ये ओमिक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण आढळून आले. कोरोनाच्या घातक अशा डेल्टा व्हेरियंटपेक्षाही ओमिक्रॉन 7 पट वेगानं पसरतोय. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ धास्तावलेत.
WHO कडून ओमिक्रॉन 'व्हायरस ऑफ कन्सर्न' घोषित करण्यात आलाय. ओमिक्रॉन व्हेरियंटमध्ये अनेक जनुकीय बदल झाले असून या बदलांमुळे त्याचा प्रसार वेगाने होण्याची भीती आहे. लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनची लागण होण्याची शक्यता आहे.
अँटीबॉडीज प्रामुख्यानं स्पाईक प्रोटीनविरोधात काम करतात. मात्र ओमिक्रॉनच्या स्पाईक प्रोटीनमध्ये जवळपास 30 बदल झालेत. त्यामुळे अँटीबॉडीज निष्प्रभ ठरतात. शिवाय लसीकरणाचा ओमिक्रॉनविरोधात फारसा प्रभाव दिसत नाही.
ओमिक्रॉनच्या भीतीनं अनेक देशांनी सावध पवित्रा घेतलाय. ब-याच देशांनी आफ्रिकन देशांतून येणा-या विमानसेवेवर बंदी घातलीय. भारतानंही तशीच बंदी घालावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलीय..
तर परदेशातून येणा-या विमान सेवेचा आढावा घ्यावा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिका-यांना दिल्यात. ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घेतल्या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी या सूचना दिल्या.आधीच कोरोनाच्या दोन लाटांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसलाय. त्यामुळं पुन्हा लॉकडाऊन लागू नये असं वाटत असेल तर लोकांनी वेळीच सावध होणं आवश्यक आहे.