नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज (रविवार) चौथा दिवस आहे. दरम्यान, युरोपियन युनियनने (EU) रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना मोठा इशारा दिला आहे. युरोपियन युनियनने पुतिन यांची संपत्ती गोठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
युरोपियन युनियनने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांची मालमत्ता जप्त करण्यास आणि इतर निर्बंध लादण्यास सहमती दर्शविली आहे. लॅटव्हियाचे परराष्ट्र मंत्री एडगर्स रिंकेविक्स यांनी ही माहिती दिली.
लाटवियन परराष्ट्र मंत्री एडगर्स रिंकेविक्स यांनी सांगितले की EU परराष्ट्र मंत्र्यांनी निर्बंधांचे दुसरे पॅकेज मंजूर केले आहे आणि गोठवलेल्या मालमत्तेत रशियाचे अध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. ते म्हणाले की, युरोपियन युनियन आणखी कडक निर्बंधांचा विचार करीत आहे.
युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिका, ब्रिटनसह 28 देश पुढे आले आहेत. जर्मनीने युक्रेनला 1000 अँटी-टँक आणि 500 स्टिंगर पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज (रविवार) रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात बैठक बोलावली आहे. फ्रान्सचे उच्च अधिकारी आणि मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संरक्षण परिषदेची ही बैठक फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे.