Donald Trump in Porn Star Case :: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चौकशीनंतर सुटका करण्यात आली आहे. 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी तोंड बंद ठेवण्यासाठी पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित गुन्हेगारी प्रकरणी ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती. यावेळी मॅनहॅटन कोर्टाबाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमा झाले. हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. मॅनहॅटन कोर्टात त्यांच्यावर सुनावणी झाली. या सुनावणीच्यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळले. दरम्यान सुटका झाल्यांनतर ट्रम्प यांनी अमेरिकेतील नागरिकांशी संवाद साधला. 2024च्या निवडणुकीत मला रोखण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी मॅनहॅटन कोर्टात 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल्स हिला तोंड बंद ठेवण्यासाठी पैसे दिले, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यांच्यावरील या गुन्हेगारी आरोपांवरील ते मॅनहॅटन कोर्टात दाखल झालेत. त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. ट्रम्प यांनी त्यांच्यावर ठेवण्यात आलेले लैंगिक संबंधाचे आरोप फेटाळून लावले आहे. परंतु त्यांनी त्यांचे माजी वैयक्तिक वकील मायकेल कोहेन यांनी पॉर्न स्टारला पैसे दिल्याचे कबूल केले आहे. 2018 मध्ये, कोहेनने फेडरल कॅम्पेन फायनान्स कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांनी गेल्या महिन्यात मॅनहॅटन तपासात साक्ष दिली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत संबंध आणि त्यांना अवाजवी फायदा दिल्याप्रकरणी 34 प्रकरणांमध्ये आरोप करण्यात आला आहे. कोर्टात हजर झाल्यावर ट्रम्प यांनी स्वत:ला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. आपण कोणताही गुन्हा केलेला नाही. आपल्या व्यवसायाच्या नोंदींमध्ये आपण कोणतीही चूक केली नसल्याचा दावाही त्यांनी केला. सुनावणीनंतर कोर्टाने त्यांना 1 लाख 22 हजार डॉलर्सचा दंड ठोठावला. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर ट्रम्प आपल्या सुरक्षा ताफ्यासह कोर्टातून बाहेर पडले.
2016 मध्ये ट्रम्प यांच्या टीमने स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिला डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या तिच्या अफेअरशी संबंधित मुद्द्यावर मौन पाळण्यासाठी USD 1,30,000 दिले होते, असा आरोप ठेवण्यात आला आहे. हे पेमेंट ट्रम्प यांचे वकील मायकेल कोहेन यांनी केले आहे. पण जेव्हा ट्रम्प यांनी ही रक्कम कोहेनला परत केली तेव्हा त्यांनी याला कायदेशीर शुल्क म्हटले आहे.
दरम्यान, ट्रम्प यांच्यावर मतदारांशी फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बिझनेस रेकॉर्डमध्ये खोटे बोलल्याचा आरोप करण्यात आला होता. जो न्यूयॉर्कच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. डॅनिअल्सला कोहेनमार्फत पैसे देऊन, त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे मतदारांना कळू द्यायचे नव्हते म्हणून यातून निवडणूक कायद्याचेही उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.