Mukesh Ambani : अब्जोंच्या संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; अदानींची घसरण सुरुच

Mukesh Ambani : इथं रिलायन्स उद्योग समुहाला उल्लेखनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या अंबानींनी पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवलेलं असतानाच, गौतम अदानी मात्र कुठच्या कुठे मागेच पडताना दिसत आहेत. श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक कितवा? पाहा...   

सायली पाटील | Updated: Apr 5, 2023, 08:38 AM IST
Mukesh Ambani : अब्जोंच्या संपत्तीसह मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती; अदानींची घसरण सुरुच  title=
Reliances Mukesh Ambani got Asias richest person spot says Forbes

Mukesh Ambani : रिलायन्स उद्योग समुहाला उद्योग क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहोचवणाऱ्या आणि भारतीय उद्योग जगतातील प्रतिष्ठीत नावांपैकी एक असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवला गेला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या Forbes Billionaire 2023 list मध्ये मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असल्याचं नमूद केलं आहे. 

अदानींची घसरण... 

मंगळवारी फोर्ब्सकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत तब्बल 83.4 अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसह अंबानी पुन्हा एकदा आशिया खंडाती श्रीमंत व्यक्तींच्या यादीत बाजी मारून गेले आहेत. जगभरातील धनाढ्यांच्या यादीत त्यांना 9 वं स्थान मिळालं आहे. तर, गौतम अदानी यांच्या नावे 47.2 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असून, जागतिक श्रीमंतांच्या यादीत त्यांना 24 वं स्थान मिळालं आहे. अदांनीच्या बाबतीत ही मोठी घसरण समजली जात आहे. 

लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे 24 जानेवारी 2023 रोजी 123 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह गौतम अदानी हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती ठरले होते. पण, अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडनबर्ग अहवालामुळं त्यांच्या संपत्तीला उतरती कळा लागल्याचं पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : पुढील सुचना मिळेपर्यंत McDonald's बंद; अनेक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

 

मुकेश अंबानी यांनी या यादीत दुसऱ्यांदा अग्रस्थान मिळवलं आहे. यावेशी फोर्ब्सच्या या यादीत तब्बल 169 भारतीय अब्जाधीशांचा समावेश आहे. 2022 मध्ये ही संख्या 166 इतकी होती. इथं अब्जाधीशांची संख्या वाढलेली असली तरीही श्रीमंतांच्या संपत्तीची संख्या मात्र 10 टक्क्यांनी घटून 675 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. 2022 मध्ये मात्र हा आकडा 750 अब्ज डॉलर्स इतका होता. 

Top 25 धनाढ्य व्यक्तींच्या संपत्तीतही घट 

फोर्ब्सच्या यादीत नमुद करण्यात आलेल्या श्रीमंतांच्या आकडेवारीनुसार जगभरातील पहिल्या 25 श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 200 अब्ज डॉलर्सनं घट झाली आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा 2300 अब्ज डॉलर्स इतका होता, तर आता तो 2100 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. 

फ्रान्सचे बर्नार्ड अरनॉल्ट 211 अब्ज डॉलर्स इतक्या संपत्तीसह जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर, टेस्लाचे एलन मस्क या यादीत दुसऱ्या स्थानी असून, त्यांच्या संपत्तीचा आकडा 180 अब्ज डॉलर्स इतका आहे. तिसऱ्या स्थानावर जेफ बेजोस (114 अब्ज डॉलर), चौथ्या स्थानी लॅरी एलिसन (107 अब्ज डॉलर) आणि वॉरेन बफे (106 अब्ज डॉलर) इतक्या संपत्तीसह या यादीत पाचव्या स्थानी आहेत.