ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी

सध्या अमेरिका कोरोनाचा सामना करत असून त्याचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे.

Updated: Apr 21, 2020, 09:21 AM IST
ट्रम्प यांची मोठी घोषणा, अमेरिकेत आता परदेशातून येणाऱ्यांवर बंदी title=

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या अमेरिकेने कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी ही मोठी घोषणा केली आहे. आता पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही बाहेरील व्यक्तीला अमेरिकेत स्थायिक होण्यास परवानगी दिली जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा मोठा निर्णय जाहीर केला. डोरोल्ड ट्रम्प यांनी कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अर्थव्यवस्थेच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सकाळी ट्वीटद्वारे घोषणा केली की, “अदृश्य शत्रूंच्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आम्हाला आपल्या महान अमेरिकन नागरिकांच्या नोकर्‍या वाचवाव्या लागतील.” हे लक्षात घेता, मी एका आदेशावर स्वाक्षरी करीत आहे, ज्यामुळे बाहेरील लोकांना अमेरिकेत स्थायिक होण्यास बंदी घालण्यात येईल. '

हे स्पष्ट आहे की पुढील आदेशापर्यंत आता कोणताही परदेशी नागरिक अमेरिकेचा नागरिक होऊ शकणार नाही आणि यासाठी अर्ज ही करु शकणार नाही. नोकरी आणि व्यवसायासाठी जगभरातील लोक अमेरिकेत जातात, जे काही काळानंतर तेथे नागरिकत्वासाठी अर्ज करतात.

लॅटिन अमेरिका, युरोपमधील मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत जातात. याखेरीज त्यांची संख्या भारतासह इतर आशियाई देशांतून वाढली आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कोणत्याही प्रकारच्या स्थलांतरणावर बंदी घातली आहे, ही बंदी तात्पुरती लागू केली गेली आहे.

विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या भयंकर स्वरूपामुळे अमेरिकेला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. गेल्या दोन महिन्यांत अमेरिकेत १० दशलक्षाहूनही अधिक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत आणि बेरोजगारांना उपलब्ध असलेल्या सुविधांसाठी अर्ज केले आहेत. याशिवाय अमेरिकन व्यवसायावर मोठे संकट निर्माण झाले आहे, म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांना हा निर्णय घ्यावा लागला.